
भारतातील अनेक राजकीय पक्ष फोडून ताबा घेतल्यावर आता ‘टाटा’चा ताबा घेण्याचे कारस्थान सुरू आहे. ‘टाटा’ची परंपरा, वारसा, विश्वास राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाचा ठरला. त्याच ‘टाटा’चा ताबा घेण्यासाठी कोणत्या अदृश्य महाशक्ती हालचाली करत आहेत?
भारतातील अनेक प्रमुख राजकीय पक्षांत फूट पाडल्यावर आता जगातील प्रख्यात ‘टाटा’ समूहात फूट पाडण्याची योजना अमलात येत आहे. हा एक राजकीय कार्यक्रम आहे. अंबानी फुटले. बिर्लांचे तुकडे झाले, पण ‘टाटा’ मात्र आता उच्च प्रतीचे कारस्थान करून तोडले जात आहे. टाटा म्हणजे देशातील जनतेचा महान विश्वास. टाटा एक राष्ट्रीय औद्योगिक व राष्ट्रीय संस्थाच मानायला हवी, जिने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून देश उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे.
9 ऑक्टोबर 2024 रोजी रतन टाटा यांचे निधन झाले. 11 ऑक्टोबरला नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली. ते रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. जानेवारी 2025 मध्ये नोएल यांना सर दोराबजी टाटा ट्रस्टचे आजीवन विश्वस्त म्हणून नियुक्त करण्यात आले. नोएल हे टाटा सन्सच्या मंडळावर ट्रस्टचे नामनिर्देशित सदस्यदेखील आहेत. टाटा सन्स व टाटा ट्रस्ट यांचा कारभार महासागराप्रमाणे आहे. त्यामुळे कोण कोठे आहे व नक्की काय करत आहेत हे सामान्यांच्या आकलनापलीकडे आहे. त्यांना फक्त ‘टाटा’ माहीत आहे. टाटांवर त्यांचा विश्वास आहे. आता जी फूट पडली आहे ती टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा व त्याच ट्रस्टचे आणखी एक विश्वस्त वेणू श्रीनिवासन यांच्यात. पुन्हा एन. चंद्रशेखरन यांच्या संघर्षाचा नवा कंगोरा आहेच. या संघर्षात शरद पवार यांच्यासारख्या जाणकारांनी नोएल टाटा यांची बाजू घेतली आहे. टाटा ट्रस्टच्या महान परंपरेला धक्का लागता कामा नये, ही त्यांची भूमिका योग्य आहे.
बाहेरची माणसे
रतन टाटा यांनी त्यांच्या हयातीत बाहेरची अनेक माणसे ‘टाटा’मध्ये आणली. त्यातले एक वेणू श्रीनिवासन. त्यांनी महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांकडे नोएल टाटा व एकंदरीत टाटा चालवीत असलेल्या संस्थांविरुद्ध तक्रार केली. टाटांविरुद्ध तक्रार म्हणजे टाटा काबीज करण्याच्या षड्यंत्राचा एक भाग आहे असे उघडपणे सांगितले जाते. टाटा सन्स व टाटा ट्रस्टमधून ‘टाटां’नाच संपवायचे असे देशातील अदृश्य शक्तींनी ठरवलेले दिसते. देशाची सर्व सार्वजनिक संपत्ती, विमानतळे, बंदरे, जमिनी वगैरे आपल्या उद्योगपती मित्रांना दिल्यावर ‘टाटा’सारखी संपत्ती त्याच मित्रांना देण्याचा हा डावपेच असावा यावर अनेकांचे एकमत आहे. टाटा समूहाची मूळ कंपनी टाटा सन्स ही आहे व ती खासगी कंपनी आहे. यातील 66 टक्के भागीदारी टाटांच्याच इतर संस्थांची आहे. यात दोराबजी ट्रस्टचा वाटा 27.98 टक्के, सर रतन ट्रस्टचा वाटा 23.56 टक्के. हे दोन मुख्य ट्रस्ट मिळून टाटा सन्सचे 51.54 टक्के भागधारक आहेत. शिवाय त्यांच्याशी संबंधित इतर छोट्या ट्रस्टचे भाग पकडून हे 66 टक्क्यांवर जाते. यातील दुसरा मोठा भागधारक म्हणजे शापूरजी पालनजी समूह आहे. त्यांचे भागभांडवल सुमारे 18.4 टक्के आहे. म्हणजे टाटा सन्सवर नियंत्रण टाटा ट्रस्टचे आहे, पण हे नियंत्रण एका व्यक्तीकडे नाही, ते ट्रस्टकडे म्हणजे विश्वस्त मंडळाकडे आहे. रतन टाटा जिवंत असेपर्यंत त्यांचे या ट्रस्टवर एकहाती नियंत्रण राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर ट्रस्टमध्ये दुफळी माजवण्यात आली आहे.
रतन टाटा यांच्यानंतर विश्वस्त मंडळातील काहींनी टाटा सन्सचे ‘खासगीपण’ संपवण्याचे ठरवले. नोएल टाटा यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यांच्या मते रतन टाटा यांच्या काळात ‘सन्स’ खासगी ठेवण्याचा निर्णय एकमताने झाला होता, पण नोएल यांच्या विरोधात इतर विश्वस्तांनी घेराबंदी केली. 24 सप्टेंबरला श्रीनिवासन यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या कारभाराची चौकशी करा, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांकडे केली आणि टाटा सन्स व ट्रस्टमध्ये फूट पडल्याचे उघड झाले. रतन टाटा यांनी ज्या वेणू श्रीनिवासन यांना टाटामध्ये आणून मोठे केले, अधिकार दिला, त्यांनीच त्यांच्या पश्चात टाटा ट्रस्टचे तुकडे करून मालकी सांगितली. ज्या पद्धतीने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस फोडून भलत्यांनाच त्या पक्षांचे स्वामित्व दिले गेले. तोच प्रकार ‘टाटां’च्या बाबतीत होत आहे. शिवसेना व इतर पक्ष फोडताना विधिमंडळातील बहुमत ग्राह्य मानले गेले, तसे ‘टाटा’त एन. चंद्रशेखरन, वेणू श्रीनिवासन वगैरेंनी निर्माण केलेले बहुमत उभे करण्यात आले.
अदृश्य महाशक्ती
टाटा ग्रुपवर अदृश्य महाशक्ती कब्जा करू पाहत आहेत. याच महाशक्तींनी देश गिळला आहे. वेणू श्रीनिवासन व चंद्रशेखरन ही त्या अदृश्य शक्तींची प्यादी आहेत. हे दोन्ही लोक एकनाथ शिंदे, अजित पवार व ऋतब्रत बॅनर्जींची भूमिका वठवत आहेत. वेणू श्रीनिवासन हे ’TVS’ कंपनीचे मालक आहेत आणि ते नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. वेणू श्रीनिवासन यांच्यावर रतन टाटांचा प्रचंड विश्वास होता. सर रतन टाटा ट्रस्ट व सर दोराबजी टाटा ट्रस्टवर वेणू यांना रतन टाटा यांनीच विश्वस्त नेमले होते. या दोन्ही ट्रस्टकडेच टाटा सन्सची जवळ जवळ 52 टक्के भागीदारी आहे. 2025 मध्ये वेणू यांना या दोन्ही ट्रस्टचे आजीवन विश्वस्त व टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष असल्याने वेणू हे टाटा सन्सचेदेखील संचालक आहेत. श्रीनिवासन हे एक उद्योगपती, ’TVS’ सारखी कंपनी चालवतात, पण ‘टाटा’चे चेअरमन नियुक्त होताच त्यांची ताकद व प्रतिष्ठा वाढली आणि त्यांनीच ‘टाटा’मध्ये बंडाळीची ठिणगी टाकली. वेणू यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, ‘नोएल टाटांचा टाटा ट्रस्टवर कोणताच अधिकार नाही. नोएल टाटांना ट्रस्टमधून हाकलून द्या. नोएल टाटा हे रतन टाटांचे वारसा पुढे नेण्याइतके कार्यक्षम नाहीत. ते दुबळे आहेत. नोएल टाटांचे चिरंजीव नेविल टाटा यांनाही ट्रस्टमधून काढा. इथे घराणेशाही चालणार नाही. टाटा ट्रस्टची चौकशी व्हावी. टाटा ट्रस्टमध्ये घोटाळेच घोटाळे आहेत.’ खरे तर ‘टाटा’ हे नाव आणि वारसा महान घराणेशाहीतून आला आहे आणि टाटा या घराण्यावर, त्यांच्या पुढच्या पिढीवर लोकांचा विश्वास आहे. जसे शिंदे हे ठाकरे होऊ शकत नाहीत, अजित पवार हे शरद पवार होऊ शकत नाही तसाच हा प्रकार आहे. वेणू श्रीनिवासन यांचा डाव असा आहे की, शेअर बाजारात टाटा सन्सचे लिस्टिंग करावे. म्हणजे शापूरजी पालनजीचे 18 टक्के शेअर विकत घेऊन टाटावर ताबा घेण्याची मोहीम पुढे नेता येईल. (यामागे अदृश्य महाशक्ती आहेत). वेणू म्हणतात, टाटात घराणेशाही आहे, पण खुद्द वेणूंचा मुलगा ’TVS’ कंपनीचा मालक आहे. अंबानी, अदानींचा कारभार त्यांच्या मुलांकडे गेला आहे. मग ‘टाटा’चा कारभार टाटांकडेच राहावा, टाटांची परंपरा कायम राहावी असे आताच्या टाटांना वाटत असेल तर काय चुकले? ‘टाटा’ काही वेणू श्रीनिवासन किंवा एन. चंद्रशेखरन यांनी बनवलेली नाही. रतन टाटा यांनी सुरू केलेल्या यात्रेतले ते त्यांचे सहकारी होते. आता देशातील कार्पोरेट, उद्योग आणि राजकीय क्षेत्रांतील ज्या हालचाली दिसत आहेत त्या पाहता शिवसेना, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, (यू) राजकीय पक्षांवर ज्या पद्धतीने ताबा मिळवला गेला, त्याच ‘पॅटर्न’ने ‘टाटा’वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
टाटा परिवार आणि परंपरा, वारसा यापुढे राहील काय?
हा प्रश्न महत्त्वाचा आहे. टाटा हा विश्वास टिकायला हवा!
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]


























































