
<< प्रसाद ताम्हनकर
[email protected]
प्लास्टिक कचरा म्हटले की, डोळ्यांसमोर पिशव्या, बाटल्या, पॅकिंगचे तुकडे आणि रोज जमा होणारा कचरा येतो. हा कचरा कमी करणे आणि त्याचा योग्य वापर करणे हे मोठे आव्हान आहे. मात्र अमेरिकेतील ओक रिज नॅशनल लॅबोरेटरीच्या संशोधकांनी प्लास्टिक कचऱ्याकडे पाहण्याची नवी दिशा दाखवली आहे. त्यांनी पॉलीएथिलीन या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून पेट्रोल आणि डिझेलसारखे द्रवरूप इंधन तयार करण्याची पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे कचऱ्यात जाणारे काही प्लास्टिक भविष्यात पुन्हा उपयोगी इंधनात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पॉलीएथिलीनचा वापर पिशव्या, काही बाटल्या, डबे आणि घरातील अनेक वस्तूंमध्ये केला जातो. हे प्लास्टिक मजबूत असल्यामुळे ते सहज विघटित होत नाही. त्यामुळे वापरून झाल्यानंतर त्याचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण होतो. सध्या प्लास्टिक जाळणे, पुन्हा वस्तू तयार करण्यासाठी वापरणे किंवा वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियांतून त्याचे रूपांतर करणे असे अनेक मार्ग आहेत. मात्र काही पद्धतींमध्ये खूप जास्त तापमान किंवा महागडी साधने लागतात. नव्या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे हे काम तुलनेने कमी तापमानात करता येते. संशोधकांनी प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी वितळलेल्या क्षारांचे मिश्रण वापरले. या मिश्रणाचे काम एकाच वेळी द्रावण आणि रासायनिक बदल घडवून आणणारे माध्यम म्हणून होते. त्यात अॅल्युमिनियम क्लोराइडचा वापर करण्यात आला आहे. या प्रक्रियेत प्लास्टिकच्या लांब आणि मजबूत रासायनिक साखळ्या छोट्या साखळ्यांमध्ये बदलतात. त्यातून पेट्रोल आणि डिझेलच्या श्रेणीतील द्रवरूप हायड्रोकार्बन तयार होतात. महत्त्वाचे म्हणजे या प्रक्रियेला बाहेरून हायड्रोजन देण्याची किंवा महागड्या धातूंच्या उत्प्रेरकांची गरज पडत नाही.
या प्रक्रियेसाठी तापमान 200 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवता येते. संशोधकांनी सुमारे 170 अंश सेल्सिअसच्या आसपास प्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. त्यामुळे कमी तापमानात होणारी ही प्रक्रिया ऊर्जा वापर कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते. या संशोधनाचा अर्थ असा नाही की, घरातील प्लास्टिक कचरा गोळा करून लगेच पेट्रोल तयार करता येईल. सध्या ही पद्धत प्रयोगशाळेतील संशोधनाच्या टप्प्यावर आहे. प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी प्रक्रिया अधिक विकसित करावी लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक वेगळे करणे, त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था उभी करणे, तयार होणाऱ्या इंधनाची गुणवत्ता तपासणे आणि संपूर्ण प्रक्रियेचा खर्च व पर्यावरणावरील परिणाम पाहायला हवा.
प्लास्टिकचा प्रश्न जगभर गंभीर होत असताना अशा संशोधनाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. भविष्यात या प्रक्रियेचा खर्च कमी झाला आणि मोठ्या प्रमाणावर वापर करणे शक्य झाले, तर आज निरुपयोगी वाटणाऱ्या प्लास्टिक कचऱयाकडेच वेगळ्या नजरेने पाहता येईल. कचरा संपवण्याबरोबरच त्यातून उपयोगी इंधन आणि रासायनिक पदार्थ मिळवण्याची दिशा या संशोधनाने दाखवली आहे. विशेष म्हणजे या पद्धतीत केवळ इंधनच नव्हे, तर उद्योगांमध्ये पुन्हा वापरता येतील असे रासायनिक पदार्थही मिळू शकतात. त्यामुळे भविष्यात प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी त्यातून मूल्य निर्माण करण्याची संधी मिळू शकते. मात्र पर्यावरणाचा खरा फायदा तेव्हाच होईल, जेव्हा संपूर्ण प्रक्रिया स्वच्छ, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल. त्यासाठी पुढील चाचण्या आणि मोठ्या प्रमाणावर प्रयोग महत्त्वाचे आहेत. प्लास्टिक वापर कमी करण्याची गरज संपणार नाही.


























































