
तळा शहराची ग्रामदेवता असलेल्या श्री चंडिका माता नवरात्रोत्सवास उद्या अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ होत आहे. मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. घटस्थापना, अखंड दीप, घटावर चढवली जाणारी अनोखी दीड माळ आणि कुमारिका पूजन हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आजही शेकडो वर्षांपासून चालत आलेली वतनदारी पद्धत तंतोतंत पाळली जाते.
देवीचा घट बसवण्यासाठी प्रत्येक समाजाला काम वाटून दिलेले आहे. कुंभार शेतातील काळी माती आणतो, बुरुड परडी आणतो. वाणी समाज घटाजवळ पेरणीसाठी सात प्रकारची धान्ये आणि नऊ दिवस अखंड तेवत राहणाऱ्या दीपासाठी तेल आणतो. नाभिक आरसा आणतो, शिंपी देवीसाठी खण आणतात तर पोतदारांकडून रोज देवीसाठी तिळाच्या फुलांची माळ बांधली जाते. यामध्ये पूर्ण माळ ही सुवासिनीची आणि अर्धी माळ ही कुमारिकेची असते. सर्व वतनदारांना कामांची वाटणी करून देण्यात आलेली आहे.
दहा दिवस दहा वाड्यांचे जागरण
घटस्थापनेला जोगवाडी, द्वितीयेला भोईरवाडी, तृतीयेला राणेचीवाडी-गोळेआळी, चतुर्थीला मुंढ्याचीवाडी व परीट समाज, पंचमीला कुंभारवाडा, षष्ठीला फोंडलवाडी, सप्तमीला राणेचीवाडी मंडलिक आळी व गवळी समाज तारणे, अष्टमीला वडाचीवाडी-मोहिते आळी व आनंदवाडी, नवमीला वडाची वाडी-पारधी आळी व रोहिदास समाज आणि दसऱ्याला पुसाटीवाडी जागरण करणार आहेत. या वाड्यांवर भजन, जागरण आणि देवीच्या अलंकारांच्या रक्षणाची जबाबदारी असते

























































