तूर, डाळिंब होरपळले; विहिरींनी गाठला तळ, सोलापुरातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाअभावी तुरीचे पीक पूर्णपणे करपले आहे, डाळिंबाच्या बागा होरपळल्या, तर पाण्याअभावी विहिरी आणि साठवण तलावांनी तळ गाठला आहे. शेतात घाम गाळूनही हातात काहीच पडण्याची आशा उरलेली नाही. दुसरीकडे, जनावरांना जगवण्यासाठी चारा आणि पाणी मिळविण्याची धडपड सुरू आहे, अशा व्यथा केंद्रीय पथकासमोर मांडत पंचनाम्याचा फार्स करण्याऐवजी तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

बेलाटीपासून मंगळवेढा, आंधळगाव, गोणेवाडी, वाणीचिंचोळी आणि घेरडीपर्यंत केंद्रीय पथकाने शुक्रवार, शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी आणि पशुपालकांशी संवाद साधला.

पावसातील दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची केळ आली आहे. जनावरांसाठी चारा महागला असून, दुग्ध व्यवसायाचेही आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच आगामी रब्बी हंगाम कसा घ्यायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी आणि ती वेळेत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाकडे केली.

केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोनुसामी यांनी केले. पथकामध्ये पेयजल व स्वच्छता विभागाचे अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहायक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश होता.

उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे केंद्रीय पथकाने शेतकरी सुभाष जाधव यांच्या शेतातील तूर पिकाची पाहणी केली. यावेळी पावसाअभावी तुरीचे पीक नष्ट झाल्याची व्यथा जाधव यांनी मांडत तुरीसाठी केलेला 21 हजारांचा वाया गेल्याचे सांगितले.

मंगळवेढा परिसरातील शेतीपिकांची पाहणी करताना आमदार समाधान आवताडे यांनी पावसाची स्थिती आणि दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती केंद्रीय पथकाला दिली. आंधळगाव येथे पथकाने बंद पडलेला हातपंप, मका आणि भुईमूग पिकांची पाहणी केली. विहिरींच्या भूजल पातळीची पाहणी केली असता, अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे निदर्शनास आले.

यावेळी राज्याचे कृषी आयुक्त सुरेश मांढरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आमदार समाधान आवताडे, कृषी सहसंचालक सुभाष काटकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जि.प. सदस्य पृथ्वीराज माने, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार निलेश पाटील, मदन यादव, बाळूबाई भागवत, रामचंद्र माळी, अमित माळी उपस्थित होते.