
नेपाळमध्ये पुन्हा एकदा भीषण महापुरामुळे हाहाकार उडाला आहे. दीड महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरातून सावरत असलेल्या नेपाळमधील गोरखा जिल्ह्यातील चुमनुब्री भागात पहाटे बुर्ही गंडक नदीला अचानक पूर आला. यामुळे पैयू आणि बगर या गावातील जवळपास 35 घरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक गावांना पुराचा फटका बसला असून वाहतुकीसाठी वापरले जाणआरे पूल आणि झुलते पूलही वाहून गेले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून काही लोकांना एअरलिफ्टही करण्यात आले आहे.
गोरखाचे प्रमुख जिल्हा अधिकारी धरेन्द्र कुमार मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी मोठा पूर आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नेपाळी लष्कराचे हेलिकॉप्टर पाठविण्याची तयारी करण्यात आली. दरम्यान, नदीच्या खालच्या प्रवाहातील आणि किनारी भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
VIDEO | Nepal: Nepali Army evacuates six people by air from the landslide-prone Jagat area following flooding in the Budhi Gandaki River.
A composite quick reaction team stationed in Kathmandu has also been deployed to the area by air for search and rescue operations.
(Source: Nepal Army’s X handle)
(Full video available on PTI Videos – https://t.co/bIyFWTeOLF)
— Press Trust of India (@PTI_News) October 11, 2026
बुर्ही गंडक नदीच्या पुरामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. आरुघाट ग्रामीण नगरपालिकेतील सोती आणि मांबू यांना जोडणारा मोटार पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. चुमनुब्री ग्रामीण नगरपालिकेतील न्याकचेत येथे न्याकचेत आणि सिर्दिबास यांना जोडणारा जुना झुलता पूलही कोसळून वाहून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याशिवाय धार्चे ग्रामीण नगरपालिकेतील माछीखोला ते केरौजा यांना जोडणारा झुलता पूलही पुराच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाला. आरुघाट ग्रामीण नगरपालिका क्षेत्रातील सोती येथील लोखंडी पूलदेखील पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. या पुलांमुळे अनेक गावांचा परस्परांशी असलेला संपर्क विस्कळीत झाला असून मदतकार्य पोहोचविण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
भूस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडला
चुमनुब्री ग्रामीण नगरपालिकेचे अध्यक्ष निमा लामा यांच्या माहितीनुसार, परिसरातील चुम्के खोला येथे भूस्खलन झाल्यामुळे नदीचा प्रवाह अडला होता. त्यानंतर पाण्याचा साठा वाढून अचानक पुराची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे नदीच्या आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चुमनुब्री ग्रामीण नगरपालिकेच्या उपाध्यक्षा लक्ष्मी गुरुंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोभान, घट्टेखोला, जगत आणि सल्लेरी या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. काही घरांमध्ये पाण्यासोबत चिखल आणि दगडधोंडे शिरल्याच्या बातम्याही येत आहेत. येथे बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.























































