
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱया टी-20 क्रिकेट सामन्यातही धावांचा अक्षरशः पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. रांची येथे झालेल्या मागील सामन्यात अवघ्या 38.3 षटकांत तब्बल 501 धावा चोपल्या गेल्या. आता इंदूरच्या फलंदाजीला पोषक मैदानावर दोन्ही संघ तिसऱया सामन्यासाठी पुन्हा आमने सामने येणार आहेत.
रांचीमध्ये हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी गोलंदाजांना अक्षरशः जेरीस आणले. या सामन्यातील 501 धावांपैकी 352 धावा चौकार आणि षटकारांतून आल्या. इंदूरचे मैदानही मोठय़ा धावसंख्येसाठी प्रसिद्ध आहे. येथील सीमारेषा तुलनेने लहान असल्याने फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी मिळते. इंदूरमध्ये झालेल्या मागील तीन एकदिवसीय सामन्यांत 399, 385 आणि 337 अशा मोठय़ा धावसंख्या नोंदल्या गेल्या आहेत, मात्र मोठी धावसंख्या उभारणे आणि तिचा बचाव करणे हे दोन्ही संघांसाठी आव्हान असेल. इंदूरमध्ये 200 हून अधिक धावसंख्या उभारल्यानंतर ती यशस्वीपणे राखण्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे नाणेफेक, दव आणि गोलंदाजांची कामगिरी सामन्याचा निकाल ठरवण्यात महत्त्वाची ठरू शकते.
संभाव्य दोन्ही संघ
हिंदुस्थान : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, नितीश कुमार रेड्डी/शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मयंक यादव आणि अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडीज : शाय होप (कर्णधार आणि यष्टिरक्षक), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, रोस्टन चेस, शमार स्प्रिंगर, अकेल हुसेन, शमार जोसेफ आणि गुडाकेश मोती.
हिंदुस्थानच्या संघात बदल होणार की नाही
मागील सामन्यात दवामुळे गोलंदाजांना अडचणी आल्याने हिंदुस्थानच्या संघरचनेत मोठे बदल होतील, असे दिसत नाही. शिवम दुबेच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी देण्याचा पर्याय हिंदुस्थानसमोर आहे. अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग यांच्यावर गोलंदाजीची महत्त्वाची जबाबदारी असेल. दुसरीकडे रांचीतील विजयामुळे वेस्ट इंडीजचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे तेच विजयी संयोजन कायम ठेवण्याची शक्यता आहे.


























































