
>> शिवाजी साटम, ज्येष्ठ अभिनेते
मराठी रंगभूमी, सिनेमा, हिंदी चित्रपट आणि समाजकार्य या क्षेत्रात आपल्या असामान्य कर्तृत्वानं स्वतचं वेगळं अवकाश निर्माण करणारा अभिनयसम्राट आणि कार्यसम्राट नाना पाटेकर आपल्यातून कायमचा निघून जाणं हे पराकोटीचं दुःख आहे. वयाच्या पंचाहत्तरीतही फिटनेसबाबत अत्यंत काटेकोर असणारा, या वयातही नियमित व्यायाम करणारा नाना हृदयविकाराच्या झटक्यानं जाणं हा नियतीचा खेळ म्हणावा लागेल. नानाची आणि माझी ओळख नाटकापासूनची. पुढे आम्ही चित्रपटांतही एकत्र काम केलं. मी अत्यंत मध्यमवर्गीय वातावरणातून आलेला माणूस. अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना अनेक माणसं भेटली, अनेक अनुभव आले, पण नानाशी असलेलं नातं वेगळं होतं. आमची रोज भेट होत असे असं नाही. कधी गणपतीच्या निमित्ताने भेट व्हायची, तर कधी एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने. मात्र आमच्यातला संपर्क, संवाद कायम होता.
माझ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवासात नानाचा फार मोठा वाटा आहे. खरे तर नानामुळेच मी हिंदी चित्रपटांत आलो, असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. त्यामागे एक आठवण आहे. ‘यशवंत’ या चित्रपटाची तयारी सुरू होती. त्या चित्रपटात नाना होता. त्यात माझ्यासाठीही एक भूमिका होती. चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित व्यक्तीचा मला फोन आला. त्यांनी मला भेटायला बोलावलं. मी गेलो तेव्हा त्यांनी ‘यशवंत’ या चित्रपटात पोलिसाची एक चांगली भूमिका असल्याचं सांगितलं, पण मला ती भूमिका करायची नव्हती. कारण त्याआधी मी पोलिसाच्या भूमिका केल्या होत्या. पुन्हा तशीच भूमिका करण्याची माझी इच्छा नव्हती. मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मात्र ते माझ्या मागे लागले. मीही माझ्या निर्णयावर ठाम होतो. केवळ आग्रह केला म्हणून भूमिका स्वीकारायची, असं मला वाटत नव्हतं.
शेवटी त्यांनी मला सांगितलं की, या भूमिकेसाठी नाना पाटेकरनेच तुमचं नाव सुचवलं आहे. तरीही मला भूमिका करायची नसेल तर मी काय करू, असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर मग थेट नानाचा मला फोन आला. त्याने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने माझ्याशी संवाद साधला. आमच्यात जी भाषा चालायची, त्याच भाषेत त्याने समजावलं आणि अखेर मी ‘यशवंत’ चित्रपटात काम करायला तयार झालो. विशेष म्हणजे हा चित्रपट माझ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवासासाठी महत्त्वाचा ठरला. म्हणूनच नानाचं माझ्या कारकीर्दीतील योगदान मी कधीही विसरू शकणार नाही.
नंतरच्या काळात आम्ही ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात एकत्र काम केलं. तो अतिशय सुंदर चित्रपट होता. त्याचं कथानक मला फार आवडलं होतं. त्यात माझी भूमिका महत्त्वाची होती. नानानेही त्या चित्रपटात अप्रतिम काम केलं होतं. त्याचा अभिनय इतका सुंदर झाला होता की, त्याला त्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता, असं मला वाटलं होतं. कारण नानाने त्या भूमिकेत आपल्यातील कसदार आणि सशक्त अभिनेत्याची एक वेगळी झलक दाखवली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. घरच्या परिस्थितीमुळे मला अनेक गोष्टी सांभाळाव्या लागत होत्या. तेव्हा नानाने मला खूप आधार दिला. अरुणा इराणी आणि चित्रपटाशी संबंधित इतर सहकाऱयांनीही मला सांभाळून घेतलं. मात्र त्यात नानाचा पुढाकार मोठा होता. घरच्या अडचणी, रुग्णालयाशी संबंधित कामं आणि चित्रीकरणाच्या वेळा या सगळ्यांचा विचार करून मला खूप सहकार्य केलं. नानाची ही आत्मीयता, सहृदयता मी विसरू शकत नाही. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ हा चित्रपट माझ्यासाठी अभिनयाच्या दृष्टीने जसा महत्त्वाचा होता, तसाच त्या चित्रपटाच्या निमित्ताने आलेला अनुभवही खूप मोलाचा होता.
चित्रीकरणाचे ठिकाण असो वा व्यावहारिक आयुष्य, नानाचा रोखठोकपणा आणि स्पष्टवत्तेपणा कधी लपला नाही. त्यामुळे अनेकांना नानाची भीती वाटायची. नाना प्रत्यक्षात कसा असेल, तो किती रागीट असेल असं लोकांना वाटायचं, पण प्रत्यक्षात तो अतिशय हळव्या मनाचा सच्चा माणूस होता. त्याला जवळून ओळखणाऱयांनाच हा हळवेपणा समजू शकला. या जिवाभावाच्या मित्राला श्रद्धांजली वाहण्याची वेळ यावी, याहून दुसरे दुःख ते काय?


























































