
बॉलिवूड तसेच टीव्ही विश्वातील अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन त्यांच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवांविषयी सांगितले आहे. त्यानंतर संपूर्ण चित्रपट व मालिकासृष्टीत खळबळ उडाली होती. आता आणखी एका अभिनेत्रीने पुढे येत तिच्या सोबत घडलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निती टेलरने करिअरच्या सुरुवातीच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका वृद्ध दिग्दर्शकाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती, असे एका मुलाखतीत सांगितले आहे. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नीतीने हा भयंकर अनुभव शेअर केला. या अश्लील मागणीनंतर तिने तत्काळ तो प्रोजेक्ट सोडल्याचे सांगितले.

याविषयी बोलताना नीती म्हणाली, “मी सुरुवातीला साउथच्या चित्रपटांमध्ये काम करत होते. मी फक्त दोनच साउथ सिनेमे केले आहेत. त्यातील एका दिग्दर्शकाने त्या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मला पुन्हा फोन केला आणि दुसऱ्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. मात्र यावेळी त्या दिग्दर्शकाने जी मागणी केली ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्याने मला दुसऱ्या चित्रपटासाठी त्याच्यासोबत झोपावं लागेल असे सांगितले. त्याचे हे शब्द ऐकून मला मोठा धक्का बसला आणि मी सुन्न झाले. मला नक्की काय प्रतिक्रिया द्यावी तेच समजत नव्हते. मी लगेच फोन कट केला, त्याचा नंबर ब्लॉक केला आणि थेट माझ्या आईला फोन लावून सगळा प्रकार सांगितला.” असे नितीने सांगितले.
नीतीने पुढे सांगितले, “तो दिग्दर्शक वयाने म्हातारा होता. मी त्याला इतर मुलींसोबतही पाहिले होते, पण कधीतरी माझ्यासोबतही असे काही घडेल याची मी कल्पनाही केली नव्हती.” या घटनेमुळे ती प्रचंड घाबरली होती. या किळसवाण्या प्रकारानंतर तिने त्या दिग्दर्शकासोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

























































