आपण आणीबाणीच्या उंबरठ्यावर आहोत का? राजस्थानमध्ये प्रवक्त्याला अटक केल्यामुळे CJP आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसआयआर आणि निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभाराविरोधात देशभरात रान उठले आहे. इंडिया आघाडीसह कॉक्रोच जनता पार्टीही रणांगणात उतरली असून विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान, राजस्थानमधील अनलवर जिल्ह्यात सीजेपीचे संघटन सह-प्रभारी दीपक बालियान यांना पोलिसांनी गुरुवारी रात्री राहत्या घरातून जबरदस्तीने उचलून नेले. बालियान यांचा पाय फ्रॅक्चर असतानाही पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली असा आरोप सीजेपीने केला आहे. तसेच आपण आणीबाणीच्या उंबरठ्यावर आहोत का? असा सवालही सीजेपीने एक्सवर पोस्ट करत केला आहे.

सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रंका यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 8 ऑक्टोबरच्या रात्री कठूमर येथील घरातून पोलीस बालियान यांना घेऊन गेले आणि मध्यरात्री उशिरा त्यांना सोडण्यात आले. बालियान यांच्या पायाला दुखापत (फ्रॅक्चर) झालेली असतानाही पोलिसांनी त्यांना ओढत नेले, ज्यामुळे त्यांच्या पायाला पुन्हा दुखापत झाली आहे. याबाबत बालियान यांच्या कुटुंबीयांनाही रात्री काय घडले याबाबत माहिती दिली आहे.

स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी बोलावले असल्याचे सांगून पोलीस घरात शिरले. या संपूर्ण कारवाईचे बालियान यांनी सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केले. यामुळे पोलीस सुरुवातीला निघून गेले. मात्र, काही वेळाने पोलीस पुन्हा आले आणि लाईव्ह व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी करू लागले. व्हिडिओ डिलीट करण्यास नकार दिल्याने पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

बालियान यांना ताब्यात घेतल्यानंतर सुमारे 100 किलोमीटर फिरवण्यात आले आणि त्यानंतर त्यांना घराच्या जवळ सोडण्यात आले. काही मर्यादा ओलांडल्या जाऊ नयेत आणि राजस्थान पोलिसांना अखेर याची जाणीव झाली हे चांगले झाले, अशी प्रतिक्रिया रंका यांनी दिली. याआधीच्या एका पोस्टमध्ये त्यांनी राजस्थान पोलिसांच्या या वर्तनाची तुलना गुंडगिरीशी केली होती.

10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर निदर्शने

या घटनेनंतर कॉक्रोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. मतदार यादीत फेरफार करून लाखो नावे वगळल्याचा आरोप करत पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.