
पितृपक्षात पितरांना खूश करण्यासाठी नैवेद्याच्या पानावर वेगवेगळ्या भाज्यांचे चवदार जिन्नस बनवले जात असल्याने गेल्या आठ दिवसांपासून भाज्यांची प्रचंड मागणी वाढली आहे. त्यातच आता रविवारपासून नवरात्र सुरू होत आहे. त्यामुळे पुढचे दहा दिवसही घराघरात शुद्ध शाकाहारी स्वयंपाक होणार असल्याने अख्खा महिना भाज्यांवरच काढावा लागणार आहे. त्यातच एकीकडे मागणी वाढली असली तरी पुरवठा पुरेसा होत नसल्याने भाज्यांनी प्रचंड भाव खाल्ला आहे. वाटाणा, गवार, कारली आणि भेंडी या भाज्यांच्या दरात तब्बल दुप्पटीने वाढ झाली आहे. कांदा आणि लसणापाठोपाठ भाज्यांचे दर वाढल्यामुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे.
भाज्यांचे दर किलोमध्ये
| वाण | आजचे दर | आठवडाभरापूर्वीचे दर |
| टोमॅटो | २० ते २२ | १६ ते १८ |
| भेंडी | ३० ते ३५ | २० ते २४ |
| वाटाणा | १०० ते ११० | ६० ते ७० |
| गवार | ७० ते ८० | ३० ते ४० |
| वांगी | ३० ते ३२ | २८ ते ३० |
| कारली | ३६ ते ४० | २० ते २४ |
| पडवळ | १० ते १२ | ९ ते १० |
| मेथी (जुडी) | ३० ते ३५ | १० ते १२ |
किराणामाल, धान्यधान्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात गेल्या काही महिन्यांत भरमसाठ वाढ झाली तरी भाजीपाल्याचे दर स्थिर होते. गेले चार महिने ठोक बाजारात भाजीपाला कवडीमोल दराने विकला जात होता. श्रावण महिन्यात भाज्यांचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र श्रावण महिन्यात आणि गणेशोत्सवातही भाज्यांच्या दरात कोणतीच वाढ झाली नाही. आवक जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे गेल्या चार महिन्यांत भाजीपाला मार्केटमध्ये मंदी राहिली. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भोपळा, वांगी या भाज्या कवडीमोल दराने विकल्या गेल्या. भाज्यांच्या दरात वाढ होत नसल्याने या पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.
आणखी दरवाढ होणार
महाराष्ट्रात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, गेल्या चार महिन्यांत भाजी बाजारात असलेली मंदी, यामुळे भाज्यांच्या दरात आता वाढ होऊ लागली आहे. दिवसेंदिवस मालाची आवक घटत चालली आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. त्यामुळे नवरात्रीनंतर भाजीपाल्याच्या दरांमध्ये आणखी वाढ होणार आहे. ठोक बाजारातील भाज्यांच्या दरापेक्षा किरकोळ बाजारात तीन ते चारपट दराने भाज्या महाग विकल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया भाजीपाला मार्केटमधील व्यापारी शंकर फडतरे यांनी व्यक्त केली आहे.
■ पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाचा हंगाम वाया गेला असून रब्बीचा हंगामही पूर्णपणे धोक्यात आला आहे. त्याचा परिणाम आता भाजीपाला मार्केटवर जाणवू लागला आहे. वाटाण्याचा दर ठोक मार्केटमध्ये ११० रुपये किलोपर्यंत गेला असून गवार ८० रुपये किलो या चढ्या दराने विकली जात आहे. याच भाज्या किरकोळ बाजारात सुमारे २०० रुपये किलो या दराने विकल्या जात आहेत.
■ नाशिक, पुणे, संगमनेर, अहिल्यानगर, लातूर या पट्ट्यातून सध्या मार्केटमध्ये भाज्यांची आवक सुरू आहे. त्यामुळे टोमॅटो, वांगी भोपळा, पडवळ या भाज्यांचे दर १० ते २२ रुपये किलोच्या दरम्यान ठोक बाजारात आहेत. मेथीच्या दरात मात्र दुप्पटीने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी १० रुपयांना मिळणारी मेथीची जुडी आता ३५ रुपयांना विकली जात आहे.




























































