
सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा स्फोट झाल्याच्या वृत्तानंतर हिंदुस्थानी विमान कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव रियाधसाठीची उड्डाणे तात्पुरती रद्द केली आहेत किंवा त्यात कपात केली आहे. एअर इंडिया, अकासा एअर आणि इंडिगो या कंपन्यांनी गुरुवारी हा निर्णय घेतला. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अकासा एअरने रियाधला जाणारी आणि तेथून येणारी उड्डाणे शनिवारपर्यंत स्थगित केली आहेत. इंडिगोने शुक्रवारपर्यंत रियाधसाठीची उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाचे दिल्लीहून रियाधला जाणारे विमान गुरुवारी सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा दिल्लीला परतले. त्यानंतर हे उड्डाण रद्द करण्यात आले. एअर इंडियानेही शनिवारपर्यंत रियाधला जाणारी आणि तेथून येणारी सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत.
जर्मनीतील लुफ्थांसा समूहानेही मध्यपूर्वेतील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 16 ऑक्टोबरपर्यंत रियाधसाठीची उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. लुफ्थांसा समूहाच्या मालकीच्या लुफ्थांसा एअरलाइन्ससह अन्य युरोपीय विमान कंपन्यांच्या सेवांवरही याचा परिणाम होणार आहे.
हुती बंडखोरांकडून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा
येमेनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांनी रियाध विमानतळावर झालेल्या ताज्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामुळे विमानतळाचे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी या दाव्यावर तातडीने प्रतिक्रिया दिली नव्हती.
यानंतर हुती बंडखोरांच्या लष्करी प्रवक्त्याने रियाध आणि नैऋत्य सौदी अरेबियातील नजरान शहराच्या विमानतळांना लक्ष्य करून आणखी बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला. या हल्ल्यांमुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याचेही बंडखोरांनी म्हटले आहे.
रियाध विमानतळावरील उड्डाणे पुन्हा बंद
जागतिक विमानसेवेवर लक्ष ठेवणाऱ्या फ्लाइटरडार24 या संस्थेने गुरुवारी दुपारी समाजमाध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार, रियाध विमानतळावरील विमानसेवा पुन्हा बंद करण्यात आली होती. विमानतळावर शेवटचे विमान 80 मिनिटांहून अधिक वेळापूर्वी उतरले होते, तर शेवटचे विमान 90 मिनिटांहून अधिक वेळापूर्वी उड्डाण करून गेले होते, असे संस्थेने नमूद केले.
6 आणि 7 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियातील विमानतळांवर हुती बंडखोरांनी हल्ले केल्याच्या वृत्तानंतर ही घडामोड घडली आहे. त्यामुळे या परिसरातील हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या एका वेगळ्या हल्ल्यात 1 व्यक्तीचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाल्याचे सांगितले होते. हुती बंडखोरांचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून सौदी अरेबियातील विमानतळांना लक्ष्य केल्याचा दावा केला होता.
हिंदुस्थानकडून हल्ल्यांचा निषेध
सौदी अरेबियातील विमानतळांवर झालेल्या हल्ल्यांचा हिंदुस्थानने गुरुवारी तीव्र निषेध केला. अब्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करणे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, गेल्या काही दिवसांत झालेल्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांप्रति मंत्रालयाने संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे.
हिंदुस्थान सौदी अरेबियातील नागरिक आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे विमानसेवेवर होणारे परिणाम आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.




























































