राहुल गांधी आक्रमक… राजघाटावर धडकले शेकडो खासदार; इंडिया आघाडीची आज राष्ट्रपती भवनावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतचोरी आणि निवडणूक घोटाळय़ाच्या विरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले आहेत. घोटाळेबाज ज्ञानेश कुमारांना घालवणारच या निर्धाराने मैदानात उतरलेल्या इंडिया आघाडीचे खासदार उद्या, शुक्रवारी राष्ट्रपती भवनावर धडक देणार आहेत. तत्पूर्वी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो खासदारांनी आज राजघाट येथे आंदोलन केले.

इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज सलग तिसऱया दिवशी दिल्ली दणाणून सोडली. पहिले दोन दिवस पोलिसांनी निवडणूक आयोग आणि जंतरमंतर येथे आंदोलन करण्यापासून रोखल्याने आज विरोधकांनी राजघाटाकडे मोर्चा वळवला. पोलिसांनी आधी परवानगी नाकारली, मात्र खासदार आंदोलनावर ठाम राहिल्याने पोलिसांनी माघार घेतली.

10 खासदारांचे शिष्टमंडळ द्रौपदी मुर्मू यांना भेटणार

विरोधी पक्षांचे खासदार शुक्रवारी संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढणार आहेत. राष्ट्रपती भवन येथे पोहोचल्यानंतर दहा खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. देशातील निवडणूक घोटाळे, एसआयआरमधील गैरप्रकार राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी करणार आहेत. मात्र राष्ट्रपती भवनकडून त्यांना अद्याप भेटीची वेळ मिळाली नसल्याचे समजते.

ज्ञानेश कुमारांच्या सुरक्षेत वाढ

देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ज्ञानेश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ज्ञानेश यांना सध्या झेड प्लस सुरक्षा आहे.

भारत देश के तीन गद्दार मोदी, शहा, ज्ञानेश कुमार…

भारत देश के तीन गद्दार… मोदी, शहा, ज्ञानेश कुमार… अशी ती घोषणा होती. ही घोषणा लिहिलेला फलक खुद्द काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी झळकवला.