
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट कोणी रचला, तसेच शस्त्रांसाठी पैसे कुणी पुरवले याचा सखोल तपास करायचा असल्याने ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने आज सत्र न्यायालयात निखील यादव व नितेश पवार या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली असून आरोपींची कोठडी पाच दिवसांनी वाढवली आहे.
पूर्णेकर हत्या प्रकरणातील पकडण्यात आलेला पहिला आरोपी पप्प्या शिंदे तपासात योग्य सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. हत्येचा कट रचण्यात कोणाचा हात आहे, हत्येसाठी वापरलेले पिस्तूल आणि शस्त्रास्त्रांची खरेदी करण्यासाठी पैसे कोणी पुरवले तसेच यामागे कोणते राजकीय किंवा जुने वैमनस्य आहे का? या मुख्य बाबींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून मागितली आहे. गुन्हे शाखेने नुकतेच कर्नाळा येथील एका जंगलातून हत्येसाठी वापरलेले पिस्तूल आणि आरोपीचा मोबाईल फोन हस्तगत केला आहे. या मोबाईलमधील डेटावरून गुन्ह्यासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारांचे आणि इतर सूत्रधारांचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. दरम्यान या हत्येचा कट माजी महापौर मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी रचल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी अनेकदा केला आहे. तसेच पुरवणी जबाबातही त्यांची नावे घेण्यात आली आहेत.
“एक पिस्तूल सापडले आहे तर अजून एक पिस्तूल रिकव्हरी करणे बाकी आहे. प्रथमदर्शनी दोन्ही पिस्तूल एकाच बुलेटच्या आहेत असे दिसून येत आहे. हे पिस्तूल सहजासहजी मिळत नाही. राजकीय आशीर्वादाशिवाय हे पिस्तूल मिळू शकत नाही असा अंदाज आहे. आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ.”
समीर हाटले, (पूर्णेकर कुटुंबीयांचे वकील)
आणखी दोन आरोपींचा शोध बाकी
आरोपी नितेश पवार आणि निखील यादव यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर आणि पोलिसांनी केलेल्या तपासासाठीच्या मागणीनंतर न्यायालयाने दोघांनाही १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हत्येसाठी वापरण्यात आलेले एक पिस्तूल पोलिसांनी कर्नाळ्याच्या जंगलातून जप्त केले असले तरी आणखी एका पिस्तुलाचा शोध लागलेला नाही. या पिस्तुलासह आणखी दोन फरार आरोपींचा शोध घेणे बाकी असल्याचे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दोन पिस्तूल आणि तीन चॉपरने केली हत्या
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित असल्याचा दावा पोलिसांनी आज न्यायालयात केला. हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर एकाच वेळी दोन पिस्तूल आणि तीन चॉपरचा वापर करून हल्ला केला होता. पूर्णेकर कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहू नयेत, याच उद्देशाने ही घातक हत्यारे आणली गेली होती, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.


























































