‘सेवा संकल्प’ अभियानातून व्हिलचेअर, वॉकर, कुबड्या वाटप, उल्हासनगर पालिकेची दिव्यांगांवर मायेची पाखर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दैनंदिन जीवनातील अडचणींशी झुंज देणाऱ्या दिव्यांगांवर उल्हासनगर महापालिकेने मायेची पाखर घातली आहे. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाच्या वतीने दिव्यांगांना व्हिलचेअर, वॉकर, कुबड्या, स्टिक, टॉयलेट खुर्ची आदी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. पालिकेच्या या मदतीमुळे दिव्यांगांच्या स्वावलंबनाला बळ मिळणार आहे.

पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या निर्देशानुसार आयोजित केलेल्या या उपक्रमात उपायुक्त स्नेहा करपे आणि दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन कामांसाठी अनेकदा इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन महापालिकेने ‘सेवा संकल्प अभियान’ राबवून दिव्यांगांना आवश्यक साधने उपलब्ध करून दिली.

स्वावलंबनाला बळ

व्हिलचेअर, वॉकर, कुबड्या आणि स्टिक यासारख्या साधनांमुळे लाभार्थ्यांना घराबाहेर पडणे, दैनंदिन कामे करणे तसेच स्वतःच्या हालचाली करणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित न राहता दिव्यांगांच्या स्वावलंबनाला बळ देणारा ठरला आहे. यावेळी अधीक्षक दत्तात्रय जाधव, वरिष्ठ लिपिक उदय वानखेडे, गौतम कसाणे, मंदा आगळे, सुशीला भालचिम तसेच दिव्यांग संघटनेचे राजेश साळवे आणि रिहाना कुरेशी उपस्थित होते.