आम्हाला त्रास द्याल तर अलका चौकात बसू! रोहित पवारांचा पोलिसांना इशारा; एमपीएससी विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळ बदलण्याचे फर्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी एस. एम. जोशी पुलाजवळ आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आठ दिवसांपासून आंदोलन विद्यार्थ्यांचे सुरू आहे. गुरुवारी पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नसून, वाहतुकीस अडचण होण्यासह अन्य कारणे देत एस. एम. जोशी पूल सोडून अन्य ठिकाणी जाण्याचा आदेश दिला. मात्र, रोहित पवार आणि आंदोलकर्ते विद्यार्थ्यांनी तेथून हटण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एस. एम. ओशो पुलाजवळ १ ऑक्टोबरपासून एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलनासाठी बसलेले आहेत. परंतु, हे आंदोलन बेकायदेशीर असून त्यामुळे परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे, अशी कारणे देत पोलिसांनी आंदोलकांना जागा सोडण्यास सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ डॉ. आंबेडकर पुतळा परिसर येथे आंदोलनासाठी परवानगी मागितल्यास सकारात्मक विचार करू, असे पोलिसांकडून आंदोलकांना सुचवण्यात आले.

रोहित पवारांसह विद्यार्थ्यांनी आंदोलनस्थळ सोडण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला, रोहित पवार म्हणाले, “पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले नाही, तर आम्ही अलका चौकात जाऊन बसू, आंदोलनामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे दाखवण्यासाठी पोलिसांकडून मुद्दाम वाहने पाठवली जात आहेत. आम्ही कुणाला त्रास देत नाही, आम्हाला त्रास देऊ नका. अलका चौकात बसलो तर उठणार नाही.”

आंदोलनस्थळी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

आंदोलनस्थळी अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रोहित पवार यांनी नानांच्या निधनाने महाराष्ट्र एका संवेदनशील, गुणी आणि सामाजिक जाणिवेच्या व्यक्तिमत्त्वाला मुकल्याची भावना व्यक्त केली. नानांच्या साधेपणा, संवेदनशीलता आणि स्पष्टवक्तेपणाच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक जाणिवेचा आणि माणुसकीच्या दृष्टिकोनाचा उल्लेखही पवार यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्र म्हणून अध्यक्ष भीमनवार यांना आतून राजीनामा द्यायला सांगितले पाहिजे. पक्ष फुटला, आमदार फोडले त्यानंतर नैतिकता म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, मग एमपीएससीचा अध्यक्ष नैतिकता म्हणून पदाचा राजीनामा का देत नाही?

  • नितीन बानुगडे-पाटील, उपनेते, शिवसेना

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उभे राहिलेले हे आंदोलन अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या भविष्याशी कोणी खेळत असेल तर त्याविरोधात लढले पाहिजे. एमपीएससीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांची मोठी स्वप्ने चक्काचूर झाली आहेत. नैतिकता म्हणून जबाबदारांनी राजीनामा दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका. यात कोणतेही राजकारण नसून विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या आहेत.

  • राजेश टोपे, माजी मंत्री

विद्याथ्यांसाठी जेलमध्ये जाण्याची वेळ आल्यावर आम्ही दोन पाऊले पुढे असू. विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणात्यांच्या विरोधात हा लढा सुरू आहे.

  • भाई जगताप, आमदार