
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील 39 गावे आणि 236 वाडय़ांमधील 54 हजार 257 नागरिक आणि 41 हजार 107 पशुधनाची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एकूण 35 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुढे पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाने 16 विहिरी आणि 9 बोअरवेलदेखील अधिग्रहित केल्या आहेत.
माण तालुक्यात सर्वाधिक 31 गावे आणि 200 वाडय़ांमधील 45 हजार 702 लोकसंख्या, तसेच 38 हजार 972 पशुधन बाधित असून, तेथे, 1 शासकीय व 29 खासगी अशा एकूण 30 टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तसेच माण तालुक्यात 10 विहिरी आणि 6 बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या तालुक्यातील दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे मलवडी, मलवडी, आंधळी आणि कुकुडवाड वर्तुळातील गावांना टँकरने पाणी दिले जात आहे. खटाव तालुक्यातील 7 गावे आणि 36 वाडयांमधील 7 हजार 833 नागरिकांना 4 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. खटावमध्ये 6 विहिरी आणि 3 बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या असून मायणी, कातर खटाव, बुध आणि कलेढोण परिसरातील गावांमध्ये पाण्याचे वाटप केले जात आहे. तर, फलटण तालुक्यातील दुधेबावी मंडलातील एका गावातील 722 नागरिकांसाठी 1 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या प्रशासन टंचाईग्रस्त भागांत टँकरच्या फेऱया आणि विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.



























































