
पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या झळा आता सांगली महापालिका क्षेत्रात बसणार आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार 10 टक्के पाणी कपात होणार असल्याने दररोज 1 कोटी 30 लाख लिटर पाणीउपसा बंद केला जाणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या 12 टाक्या असून, दररोज दोन या प्रमाणे टप्प्या-टप्प्याने टाक्या बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून नियोजन सुरू असून, दसऱयानंतर पाणी कपातीची अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पर्जन्यमानात घट झाली असून, खरीप हंगामातील निकष 1 (ट्रिगर) लागू झालेल्या 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जलसाठय़ाचे काटकसरीने व्यवस्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. राज्यातील प्रमुख धरणे, जलाशये, तलाव आणि इतर जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर करून 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज सुरक्षित राहील, अशा पद्धतीने जलसाठय़ाचे धरणनिहाय आणि वापरनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात 10 टक्के पाणी कपातीचे आदेश शासनाकडून आले असून, त्यानुसार पाणी कपात सुरू करण्यात येणार आहे.
सांगली व कुपवाड शहरासाठी येथील कृष्णा नदी जॅकवेलमधून तर मिरजसाठी मिरज येथील कृष्णा नदीवरून पाणीउपसा केला जातो. सांगली, मिरज व कुपवाड शहरासाठी दररोज 130 एमएलडी पाणीउपसा केला जातो. यात आता घट करण्याचे आदेश शासनाकडून आले आहेत. त्यानुसार दररोज 10 टक्के पाणीउपसा बंद केला जाणार आहे. त्यानुसार दररोज 1 कोटी 30 लाख लिटर पाण्याची कमतरता महापालिका क्षेत्रातील नागरिकांना भासणार आहे. पहिल्या टप्प्यात कुपवाड येथील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी त्याबाबतचे पत्र प्रभाग क्रमांक दोन, आठ, नऊ व 19च्या नगरसेवकांना दिले आहे.
कुपवाड येथील चार प्रभागांसाठी मनपाच्या 12 टाक्यांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामधील दररोज दोन टाक्या बंद ठेवण्यात येणार आहेत. सोमवारी गव्हर्नमेंट कॉलनी येथील पाण्याची टाकी, मंगळवारी कापसे प्लॉट, बुधवारी शालिनीनगर, गुरुवारी शामनगर जुनी टाकी, शुक्रवारी शामनगर नवी टाकी, शनिवारी गव्हर्नमेंट कॉलनी जुनी टाकी, रविवारी कुपवाड गावठाण येथील पिण्याच्या पाण्याची टाकी भरण्यात येणार नाही. त्यामुळे ज्या टाकीवरून होणारा परिसराचा पाणीपुरवठा संबंधित दिवशी बंद राहणार आहे.


























































