
एकीकडे ऑक्टोबर हीटची होरपळ वाढली असतानाच संपूर्ण राज्यभरातून मान्सूनने पूर्ण माघार घेतली आहे. सरासरी तारखेच्या दोन दिवस आधीच मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. गुरुवारी त्याने पूर्णपणे काढता पाय घेतल्याची घोषणा हवामान विभागाने केली. त्यामुळे राज्यभरात आता उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.
मान्सूनने वेळेआधीच परतीचा प्रवास सुरू केल्यामुळे राज्यातील दुष्काळाचे संकट तीव्र झाले आहे. हवामान विभागाने गुरुवारी मान्सूनच्या वाटचालीबाबत घोषणा केली. संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तसेच तेलंगणाच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले. यंदा मान्सूनच्या संपूर्ण हंगामावर ‘एल निनो’चा प्रभाव, पावसाचा अभाव आणि ऑगस्टपासून पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली पाण्याची तूट, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या संकटाच्या परिस्थितीत मान्सूनने वेळेआधीच माघार घेतल्याने दुष्काळी परिस्थितीची चिंता वाढली आहे.
पावसाची 19 टक्के तूट
राज्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे 52 टक्के इतकी तूट निर्माण झाली आहे. मान्सूनच्या संपूर्ण हंगामात 19 टक्के पावसाची तूट आहे. दुष्काळसदृश स्थितीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाडय़ातील बहुतांश जिल्ह्यांना बसला आहे.
मुंबईत उष्णतेची लाट
मुंबईतील उकाडय़ात प्रचंड वाढ होत असून शुक्रवारी उष्णतेची लाट धडकणार आहे. हवामान विभागाने याबाबत ‘यलो अलर्ट’ जारी केला. उष्णतेत थेट पाच अंशांची वाढ झाली. शुक्रवारी शहराचा पारा 38 अंशांच्या वर जाईल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.




























































