
मुंबईत मान्सून परतीला गेला असताना मलेरिया, डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पालिकेची आरोग्य यंत्रणा ढासळल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज केली. त्यामुळे साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पेडणेकर यांनी केली असून त्यांनी याबाबत पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मलेरियाच्या रुग्णांमध्ये तब्बल 44 टक्के वाढ झाली आहे. तर स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये 709 टक्के इतकी धक्कादायक वाढ झाली आहे. बांधकामाच्या जागा आणि सर्व वॉर्डमध्ये कीटकनाशक धूम्रफवारणी योग्यप्रकारे झाली नसल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोपही किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. डासांची 29 हजारांहून अधिक उत्पत्तीस्थाने आढळली आहेत हे याचे ढळढळीत उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या विभागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले असेल त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पालिकेच्या सर्व आरोग्य पेंद्रांवर डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्लूच्या चाचण्यांचे रिपोर्ट 24 तासांत मिळण्याची व्यवस्था करावी आणि सर्व औषधे मोफत उपलब्ध करून द्यावीत अशी मागणीही पेडणेकर यांनी केली आहे.
रुग्णांना बेड मिळेनात
साथीच्या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह सर्वच रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांना बेड मिळेनासे झाले आहेत. खासगी रुग्णालयांचा हजारोंचा खर्च त्यांना परवडत नाही. याबाबत तातडीने नियोजन करण्याची मागणीही पेडणेकर यांनी केली आहे. त्यामुळे पालिकेने भायखळा, अंधेरी, परळ, वरळी आणि वांद्रेसह सर्वच वॉर्डमध्ये प्रभावी फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


























































