लग्नाचे आमिष दाखवून फसवले, मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यास 18 लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शादी डॉट कॉम’वर नावनोंदणी करून लग्नासाठी नवरा मुलगा शोधणे मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकारी महिलेस भलतेच महागात पडले. दोन जणांनी त्यांना लग्नासाठी इच्छुक असल्याचे सांगत संपर्क साधून 17 लाख 97 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

सीमा (नाव बदललेले) या मंत्रालयात एका विभागामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळांवर नाव नोंदणी केली होती. त्यानुसार सुनील नावाच्या व्यक्तीने त्यांना संपर्क साधला व त्याने यूकेचा नागरिक असल्याचे सांगत लग्न करायची इच्छा व्यक्त केली. त्याने सीमा यांचा विश्वास संपादन करून विविध कारणास्तव पैसे पाठविण्यास भाग पाडले. विशाल नावाच्या व्यक्तीनेही लग्नास इच्छुक असल्याची बतावणी केली. त्याने तो कॅनडाचा रहिवासी असल्याचे सांगितले. त्यानेही वेगवेगळी कारणं सांगून सीमा यांना पैसे पाठविण्यास भाग पाडले. दोघांच्या भुलथापांना बळी पडत सीमा यांनी 17 लाख 97 हजार इतकी रक्कम दोघांना ऑनलाईन पाठवली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दक्षिण प्रादेशिक विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.