टीम इंडियाचा विजयरथ रोखण्याचे विंडीजपुढे आव्हान, सलग अकराव्या विजयाचा श्रेयससेनेचा निर्धार, वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरच्या मैदानावर टीम इंडियाचा उधळलेला विजयरथ रोखण्याचे मोठे आव्हान वेस्ट इंडीजसमोर उभे ठाकले आहे. मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात हिंदुस्थानने सहज विजय मिळवल्यानंतर आता दुसऱया सामन्यातही बाजी मारून सलग अकरावा विजय नोंदविण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. हिंदुस्थानला मालिकेत पराभूत करायचे असेल तर विंडीजला प्रथम सलग दोन सामन्यांत हिंदुस्थानला हरविण्याची तब्बल चार वर्षांची प्रतीक्षा संपवावी लागणार आहे.

जून 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलग पराभवानंतर हिंदुस्थानने मायदेशात 42 विजय आणि केवळ 9 पराभव अशी दमदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षांहून अधिक काळ हिंदुस्थानने मायदेशात टी-20 मालिका गमावलेली नाही. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये धक्के बसल्यानंतर हिंदुस्थानने पुन्हा सलग 10 विजयांची मालिका उभारली आहे. आता स्वतःचाच 12 सलग विजयांचा विक्रम गाठण्याच्या दिशेने हिंदुस्थानी संघाची वाटचाल सुरू आहे.

जसप्रीत बुमरा, हार्दिक पंडय़ा आणि वरुण चक्रवर्ती यांसारखे प्रमुख खेळाडू संघाबाहेर असतानाही हिंदुस्थानच्या बाकावर असलेली गुणवत्ता विंडीजसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे हिंदुस्थानला त्यांच्याच भूमीत हरवण्यासाठी वेस्ट इंडीजला जवळपास निर्दोष खेळ करावा लागणार आहे.

नाणेफेक ठरवू शकते सामन्याची दिशा

हिंदुस्थानविरुद्ध मायदेशात टी-20 मध्ये वेस्ट इंडीजला आतापर्यंत 12 पैकी केवळ दोनदा विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही विजय नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग करताना मिळाले. मात्र यावेळीही तीच संधी मिळाली तरी हिंदुस्थानी फलंदाजीसमोर विंडीजच्या गोलंदाजांची खरी परीक्षा असेल. मनगटी फिरकी, मिस्ट्री स्पिन किंवा वेगवान गोलंदाजीचा अभाव ही विंडीजची मोठी उणीव ठरू शकते.

अक्षरसमोर शाई होपची कसोटी

हिंदुस्थानी संघासाठी अक्षर पटेल सध्या पॉवर प्लेमधील सर्वात विश्वासू गोलंदाज ठरत आहे. यंदाच्या विश्वचषकानंतर त्याने 15 षटकांत आठ विकेट घेताना केवळ 4.71 धावांच्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. पहिल्या टी-20 मध्येही त्याने पॉवर प्लेमध्ये विकेटसह निर्धाव षटक टाकत आपली छाप पाडली. वेस्ट इंडीजच्या शाई होपसमोर अक्षरचा सामना हे मोठे आव्हान आहे. पहिल्या सामन्यात अक्षरच्या चार चेंडूंवर होपने एकही आक्रमक फटका खेळला नाही, मात्र दिल्ली पॅपिटल्सच्या नेट्समध्ये अक्षरचा सामना करण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. त्यामुळे दुसऱया सामन्यात अक्षरला रोखण्यासाठी होपला अधिक आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे.

विंडीज संघात बदलाची शक्यता कमी

वेस्ट इंडीजकडून एकदिवसीय मालिकेत चमकलेल्या अमीर जांगूला संधी देण्याचा विचार होऊ शकतो, मात्र त्यासाठी नुकताच पदार्पण केलेल्या कामिल पूरनला बाहेर बसवावे लागेल. त्यामुळे पहिल्या सामन्यातील संघात बदलाची शक्यता कमी आहे.

हिंदुस्थानचा संभाव्य संघ – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडीजचा संभाव्य संघ – शाई होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरपर्ह्ड, रोमारियो शेफर्ड, रोस्टन चेस, शमार प्रिंगर, अकिल हुसेन, शमार जोसेफ, मॅथ्यू पह्ड.