
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘एक होती माया’ या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले. अनंत सोनवणे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात हा प्रकाश सोहळा पार पडला. वाघ काय, वाघिण काय लहानपणापासून त्यांच्यातच मी लहानाचा मोठा झालोय आणि म्हणून कदाचित वाघांबद्दल जास्त प्रेम असेल, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आज बऱ्याच दिवसांनंतर एका सभ्य विषयाच्या कार्यक्रमात आलेलो आहे. कारण जे आयुष्य आम्ही जगतो आहोत ते खरं वाइल्ड लाइफ आहे की, काय असं वाटायला लागलं आहे. मी वाइल्ड हा ‘हिंस्र’ या अर्थान बोललो. याचं कारण जंगलाची आवड ही बऱ्याच लोकांना आहे. आणि मला खरंच एक समाधान आहे. मेहताजी, कुंटेसाहेब आणि अनंत सोनवणे यांनी तुम्ही एक धाडस केलंय. पहिल्या प्रथम मेहतांजींना धन्यवाद देईन की तुम्ही असा विषय निवडलात की ज्याचं पुस्तक प्रकाश केलं तर ते विकलं जाऊ शकतं. हा विचारही आधी कुणी केला नसेल. अनंतजी तुम्ही तुमचा अनुभव अशा पद्धतीने लिहिलाय की अनेकजणांना आता ताडोबात जावसं वाटायला लागलं आहे. आणि कुंटेसाहेबांनी सगळ्यांच्या त्या इच्छेला फुलपाखराची पंख दिले आहेत. नवीन नवीन सगळे विषय समोर येत आहेत. आणि त्या विषयांमध्ये काहीजण तुमच्यासारखी रानवेडे हे इतरांना सुद्धा रानवाटा दाखवताहेत. हे एक विशेष आहे, असे कौतुक उद्धव ठाकरे यांनी केले.
माझ्याबरोबर आज तेजस आलेला आहे. याचं कारण असं की माझा उल्लेख माजी मुख्यमंत्री म्हणून जसा केला माजी वाइल्डलाइफर असाही करायला काही हरकत नाही. कारण आता माझं जंगलात जाणं थांबलेलं आहे. आवड नाही थांबली पण जंगलात जाणं थांबलं आहे. आणि ती आवड आता तेजस पुढे घेऊन जातोय. आणि तो नुसता जंगलात जाऊन फोटो काढत नाहीतर वेगवेगळे किडे, फुलपाखरं, साप, झाडं असतील यांना तो त्यांची ओळख करून देतोय. म्हणजे आपल्याला त्यांची ओळख करून देतोय. त्यांचं वेगळेपण काय, त्यांचं वैशिष्ट्य काय आणि मग ते बघितल्यानंतर असं वाटतं की आपण अजूनही आपण आपलं जग ओळखलंच नाहीये. आपल्या जगामध्ये आपल्यासोबत कोण-कोण राहताहेत याची आपल्याला ओळखच झालेली नाही. अनंतजी तुम्ही मायाची पूर्ण जीवनाची कहाणी लिहीली आहे. कोणतरी सांगेल की मुक्या प्राण्यासाठी तुम्ही लिहिलंत. आपल्यासाठी ते मुके आहेत. पण कदाचित त्यांच्यासाठी आपण बहिरे असू तर कारण त्यांची भाषा आपल्याला ऐकू येत नाही. म्हणजे त्यांच्यापैकी कोणतरी पुस्तक लिहिल आणि ते म्हणेल बिऱ्याच्या बहिऱ्यांची कशी कथा लिहिलीय बघा. कारण ते बोलतात. अगदी डॉल्फिन असतील व्हेल असतील, आफ्रिकेमधले हत्तीसुद्धा एकमेकांला नावाने हाका मारतात असं ऐकलेलं आहे. आणि ठाण्यातले आनंद शिंदे यांचा एक कार्यक्रम मी मुख्यमंत्री असताना टीव्हीवर बघितला होता. तेव्हा मुख्यमंत्री म्हटल्यावर लवाजमा असतो. तेव्हा म्हटलं शोधा या माणसाला, दोघेजणं आले. आणि त्यांचा संपूर्ण एक कार्यक्रम ठेवायला पाहिजे. मी त्यांना विचारलं की त्या हत्तींशी कोणत्या भाषेत बोलता? कारण आता मुंबईची भाषा कोणती हा विषय चाललाय तर हत्तींची भाषा कोणती? तर ते बोलले मी मराठीत बोलतो. म्हणजे सगळे हत्ती मराठी आहेत याबद्दल अभिमान असला पाहिजे. त्यांच्या सांगण्यात एक मला जाणवलं की भाषा कोणतीही असो देहबोली महत्त्वाची असते. आपल्या मनात काय आहे हे ते प्राणी बरोबर ओळखतात. आपणच ओळखू शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
माझी आणि मायाची पहिली भेट तेव्हा मी आणि तेजस होतो किती साली झाली आठवत नाही. पण कदाचित तिला माया नाव सुद्धा मिळालेलं नसेल. आम्ही ताडोबामध्ये गेलो होतो. लांब उन होतं, एक वाघिण पाणी पित होती. आम्ही झाड बघितलं झाडाच्या सावलीत उभे राहिलो. आमची ओपन जिप्सी होती. तिने पाणी प्यायलं आणि काय कारवं? सरळ उठून आमच्याकडे चालत आली. आणि आम्हाला हाकललं तिने. ती सावलीत बसली, आम्ही जरा लांब जाऊन उभे राहिलो. तिथून उठली आणि तिने आमचा पाठलाग केला. म्हणजे अशरक्षः ती धावली आमच्या जिपच्या मागे, आम्हाला तिथून घालवलं. तेव्हाच म्हटलं ही उद्याचा काळ गाजवणार. आणि तसं तिने ते राज्य केलं. कल्पना नव्हती की एखादी वाघिण आपल्या किर्तीने ताडोबाला सुद्धा ओळख एक देईल. नाहीतर वन्यजीव प्रेमींच्या नकाशावर ताडोबा नव्हतं. अगदी मी सुद्धा बांधवगड, रणथंबोर, कान्हा असेल तिथे जायचो. तिथल्या वाघिणी म्हणजे रणथंबोरची मछली होती, बांधवगडची मोहिनी होती. सोनवणेसाहेब तुम्ही म्हणालात तुमच्याही आयुष्यात वाघिण आहे, वाघिणीच जास्त नावाजल्या जाताहेत. एक वाघ दाखवा, छोटा मटका. काय नाव आहे? छोटा मटका! पण वाघिणी बघा कशी आहे? माया, मोहिनी, मछली, त्याच्यानंतर मोहिनीची आई सीता. अशी सगळ्या वाघिणी जास्त फेमस आहेत. मला वाघ काय, वाघिण काय लहानपणापासून त्यांच्यातच मी लहानाचा मोठा झालोय. आणि म्हणून कदाचित वाघांबद्दल जास्त प्रेम असेल. याचं कारण की जसं शिवसेनाप्रमुख जे म्हणायचे की, शंभर दिवस शेळीचे जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचा जगा. कारण शेळीचं आत्मचरित्र कोणी लिहिलेलं आठवत नाही पण वाघाचं लिहिलेलं आहे, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
काही फुलपाखरं शेकडो मैल मायग्रेशन करतात, त्यांना दिशा कोण दाखवतं? समुद्र पार करून जातात. मोठा महासागर पार करून जातात. कोण दाखवतं त्यांना दिशा? पक्षी म्हणजे आता पक्षांतर होतं. पक्षी मायग्रेशन करतात. आपल्याकडे पक्षांतर का होतं हे माहिती आहे. पण पक्षी मायग्रेशन करतात त्यांना कोण दिशा दाखवतं? त्यांच्या मागे तर कोण ईडी, सीबीआय, लागत नाही ना? की जा तू या दिशेला जा नाहीतर याद राख की तो पक्षी उडतो आणि जातो बिचारा तिकडे, असं नाही कुणी करत. दिशा कशी काय त्यांना मिळते, हे न उकलेलं कोडं आहे. अभ्यासक म्हटल्यानंतर कशात नेमका अभ्यास करायचा अजूनही आपण एकमेकांना समजूनच घेतलेलं नाहीये. आपल्या वस्तीत बिबट्या दिसला तर किती हाहाःकार होतो. मग विचार करा, बिबट्याच्या जंगलात माणूस दिसला तर बिबट्याची प्रतिक्रिया काय असायला पाहिजे? वाघाची प्रतिक्रिया काय असायला पाहिजे. पण आपण उचलतो डार्ट मारून आतमध्ये टाकून देतो, नाहीतर त्या अवनी सारखं मारून टाकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कालपरवा निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले की, संपूर्ण पृथ्वी आपल्या मालकीची आहे या थाटात आपण जे काही जगतो आहोत हे शेवटी विनाशाकडे नेणारं आहे. कारण ही सगळी झाडं, जंगलं आपण दणादण कापत सुटलो तर एक त्याचं काय होऊ शकतं हे करोनाने दाखवलेलं आहे. ती एक चुणूक आपल्याला दिसलेली आहे, काय होऊ शकतं? वेडं वाकडं काहीतरी विकास, विकास, विकास पाहिजे. पण ऑक्सिजन सुद्धा पाहिजे ना? का ऑक्सिजन सिलिंडर घेऊन तुम्ही आपण जगणार आहोत. विकास काय छान, सगळं काही प्रचंड मोठं घडेल. पण पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर आहे, उपयोग काय त्या जगण्याचा? जो काही समतोल आहे तो समतोल आपण विसरून चाललेलो आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्ही माया वाघिणीचं जीवन कहाणी लिहिताय, त्याच बरोबर हल्लीच्या दिवसात एक बातमी आलीय की, गेल्या ९ महिन्यांत आपल्या देशात जवळपास १३४ वाघ हे मारले गेलेत किंवा नाहिसे झालेत. प्रत्येकाचं एक आयुष्य आहे. वाघाला सुद्धा संघर्ष असतो. मी स्वतः बघितलेलं आहे की वाघिण बछड्यांसाठी ती शिकार करते आणि त्याच वेळेला दुसरा कोणतातरी वाघ येऊन ती शिकार हिरावून घेतो. पुन्हा तिला नव्याने शिकार करावी लागते. आणि असं म्हणतात की १८ वेळा प्रयत्न केल्यानंतर एकदा वाघ शिकार करण्यात यशस्वी होतो. अशा वेळेला ते सगळं मिळवलेलं ते दुसरं कोणीतरी घेऊन जातो त्यावेळेला किती पुन्हा कष्ट करत असतील. त्याच्यामुळे संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. ना माणसाला चुकला, ना वाघाला, ना फुलपाखराला चुकला. कोणालाच चुकलेला नाही. फक्त याच्यामध्ये आपण एकमेकांचं सहजीवन जर का त्याचा आदर ठेवला आणि सन्मान करून, पृथ्वी आपल्याच नव्हे तर ह्यांच्याही मालकीची आहे. ह्यांचं असणं हे आपल्यासाठी सुद्धा आवश्यक आहे ही गरज जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा असं वाटतं या सगळ्या पुस्तकाचा आणि सगळ्या जंगलाचा आपल्याला अर्थ कळेल. ह्या पुस्तकावर कार्टुन फिल्म करण्यासाठी मीसुद्धा प्रयत्न करेन आणि आपल्या वाघिणीची कहाणी जगभर कशी नेता येईल ह्यासाठी आपण प्रयत्न करूया, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



























































