
जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोठ्या संस्थात्मक सुधारणांची मागणी केली आहे. तसेच सद्यस्थितीतील वाद पाहता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदावरून त्वरित पायउतार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. गुरुवारी बिहारमधील दरभंगा येथे ते बोलत होते.
मतदार याद्यांमधील गैरव्यवहार आणि तांत्रिक मुद्द्यांवरून सध्या देशभरात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगासमोरील सद्यस्थितीतील वाद आणि समस्या या केवळ एका व्यक्तीपुरत्या मर्यादित नाहीत. त्यामुळे केवळ ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवल्याने हा प्रश्न कायमचा सुटणार नाही. यावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असल्यास निवडणूक आयोगाची विश्वासार्हता, त्यांची कार्यपद्धती आणि संस्थात्मक प्रक्रिया नव्याने सुधारण्यावर अधिक भर दिला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेतच बदल करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.



























































