
‘मृत्यूनंतर माणूस आपल्या कामाने जिवंत राहतो’ असे नाना पाटेकर नेहमी सांगायचे. जात, धर्म, गरीब-श्रीमंत अशा भेदांच्या पलीकडे जाऊन त्यांनी केवळ ‘माणूस’ पाहिला आणि माणुसकी जपली. नाना पाटेकर बुलढाणेकरांच्या स्मरणात मात्र एका वेगळ्याच कारणाने कायमचे कोरले गेले आहेत. तब्बल ११ वर्षांपूर्वी त्यांनी बुलढाण्यात मुक्काम केला होता आणि शेतकरी कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत मदतीचा हात दिला होता.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. त्यानंतर २५ ऑक्टोबर २०१५ रोजी दोघेही बुलढाण्यात आले होते. बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील १३७ आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवांना मदतीचे वाटप करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा सोहळा बुलढाणेकरांच्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेला. गर्दे हॉलमध्ये झालेला तो कार्यक्रम औपचारिक मदतवाटपाचा नव्हता, तर दुःखाशी माणुसकीने जोडला गेलेला एक संवेदनशील क्षण होता.
‘कोणाचे चुकले’पेक्षा ‘आपण काय करू शकतो’ हे महत्त्वाचे असे त्या वेळी नाना पाटेकर यांनी मांडलेले विचार त्यांच्या निधनानंतर अधिकच अस्वस्थ करणारे ठरतात. शेतकरी आत्महत्यांमागील वेदना त्यांनी केवळ आकडेवारी म्हणून पाहिल्या नाहीत. ‘आत्महत्या करणार्या माणसांच्या अवतीभोवती आपण त्यांच्या पाठीशी दिसलो, तर ती माणसे आत्महत्या करणार नाहीत. त्यांना आधार हवा आहे,’ असे सांगताना त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मानसिक आणि सामाजिक वेदनांकडे लक्ष वेधले होते.
शेतकरी विधवांचे दुःख बीडमध्ये जवळून अनुभवल्यानंतर या कुटुंबांसाठी काहीतरी केले पाहिजे, अशी भावना निर्माण झाल्याचे नाना पाटेकर यांनी त्यावेळी सांगितले होते. ‘हे काम कधीच संपणारे नाही. निदान दोन पिढ्या तरी दुसर्यांच्या कामी येता यावे, हीच खरी श्रीमंती,’ हा त्यांचा विचार त्यांच्या सामाजिक कार्याची दिशा स्पष्ट करणारा होता. ‘नाम’च्या माध्यमातून त्यांनी शेतकरी कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे केला. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर संकटात सापडलेल्या कुटुंबांना आपण एकटे नाही, असा आधार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
बुलढाण्यातील ती भेट ठरली अविस्मरणीय
नाना पाटेकर यांनी आयुष्यभर कलेला सामाजिक जाणिवेची जोड दिली. पडद्यावरचा त्यांचा परखड आवाज आणि प्रत्यक्ष आयुष्यातील माणुसकीची भूमिका यामध्ये फारसा फरक नव्हता. म्हणूनच गर्दे हॉलमधील त्यांची ती भेट आज केवळ एका कार्यक्रमाची आठवण राहिलेली नाही; ती बुलढाण्याच्या सामाजिक स्मृतीचा एक भाग बनली आहे. आज नाना पाटेकर आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी बुलढाण्यात ११ वर्षांपूर्वी व्यक्त केलेले विचार, शेतकरी विधवांच्या डोळ्यांतील अश्रू पुसताना दिलेला आधार आणि ‘आपण काय करू शकतो?’ हा त्यांनी उपस्थित केलेला सवाल आजही तितकाच जिवंत आहे. नाना पाटेकर गेले; पण त्यांनी माणुसकीच्या रूपाने पेरलेली बीजे समाजात कायम रुजत राहतील.






























































