
शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील नावे दुरुस्त करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना ग्राम महसूल अधिकारी भाऊसाहेब जगन्नाथ गवारे ( ४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जालना पथकाने बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात रंगेहात पकडले. भाऊसाहेब गवारे हे ग्राम महसूल अधिकारी असून त्यांची नेमणूक रोहिणा (बु.) सजा, तहसील कार्यालय परतूर येथे आहे.
तक्रारदार हे शेती व खासगी नोकरी करतात. त्यांनी रोहिणा खुर्द येथील गट क्रमांक १०४ मधील ४४ आर शेतजमीन खरेदी करण्याचे ठरवून संबंधित शेतकऱ्यांसोबत १०० रुपयांच्या बाँडवर इसारपावती केली होती. या जमिनीच्या मूळ मालकांच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील नावे दुरुस्त करण्यासाठी तक्रारदारांनी १ ऑक्टोबर रोजी गवारे यांची जालना येथे भेट घेतली होती.
यावेळी संबंधित काम करून देण्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी गवारे यांनी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदारांनी ६ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे लेखी तक्रार दिली. तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी परतूर येथे गवारे यांच्या खासगी कार्यालयात तक्रारदाराची भेट झाली असता, संबंधित कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे व स्वीकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीने सापळा रचला. बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८.४० वाजता आस्था हॉस्पिटल, भोकरदन नाका, जालना येथे तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गवारे यांना त्यांच्या खासगी कारमध्ये सापळा पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
सापळा पथकात पोलीस हवालदार गजानन घायवट, पोलीस अंमलदार मनोहर भुतेकर, संदीप लहाने, शिवलिंग खुळे, गणेश चेके व चालक पोलीस हवालदार बिनोरकर यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.





























































