
तेलंगणातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान हरकती आणि दावे सादर करण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमधील मुशिराबाद विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या 30 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी बनावट ‘फॉर्म-7’ सादर केल्याप्रकरणी भाजपच्या एका मतदान पेंद्र प्रतिनिधीविरोधात चिक्कडपल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
मुशिराबादचे मतदार नोंदणी अधिकारी टी. प्रवीण पुमार रेड्डी यांच्या तक्रारीवरून भाजपचा प्रतिनिधी एस. बालचंदर याच्याविरुद्ध ही प्रथमदर्शनी माहिती नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत बालचंदरने सादर केलेल्या फॉर्म-7 वर मतदारांची माहिती आधीपासूनच छापील स्वरूपात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे हे फॉर्म भाजप कार्यालयातूनच केंद्रीय स्तरावर तयार केले गेल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. हैदराबादमधील बहादुरपुरा आणि गोशामहल मतदारसंघांतही अशाच प्रकारे आधीच माहिती छापलेले फॉर्म-7 आढळल्याचे समोर आले आहे. एफआयआरमधील तपशिलानुसार, बालचंदरने 28 सप्टेंबर रोजी 210 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याकडे हे 30 छापील फॉर्म-7 सादर करण्याचा प्रयत्न केला. ज्या मतदारांशी त्याचा थेट संबंध नाही, अशा 30 लोकांची नावे वगळण्याची त्याची मागणी होती. या 30 जणांमध्ये काँग्रेसच्या एका मतदान केंद्र प्रतिनिधीचाही समावेश आहे.
बीएलओ आणि बीएलओ पर्यवेक्षकांनी एकत्रितपणे हे फॉर्म स्वीकारण्यास नकार दिला. विनंती करूनही अधिकाऱ्यांनी कागदपत्रे नाकारल्याने बालचंदर हे फॉर्म कार्यालयाच्या आवारातच टापून तेथून पसार झाला. पडताळणीत मतदार त्याच पत्त्यावर आढळले. यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खातरजमा केली असता आक्षेप घेतलेले सर्व 30 नागरिक मुशिराबादचेच रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.




























































