
देशातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना अभिनेते आणि खासदार कमल हासन यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहिले आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी ज्ञानेश कुमार यांनी विरोधी खासदारांची भेट घ्यावी, असे आवाहन केले आहे. इंडिया आघाडीतील विरोधी खासदारांनी बुधवारी अशोका रोडवर धरणे आंदोलन करत ‘व्होट चोरी’च्या आरोपांवरून आवाज उठवला. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पदावरून हटवण्याची मागणीही करण्यात आली. यापूर्वी विरोधी खासदारांनी निवडणूक आयुक्तांची भेट मिळावी, या मागणीसाठी सुमारे आठ तास धरणे आंदोलन केले होते.
या पार्श्वभूमीवर कमल हासन यांनी ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून निवडणूक आयोगाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी संवादाची गरज व्यक्त केली. कमल हासन यांनी ‘भारतीय निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहन’ या विषयाखाली हे पत्र लिहिले. पत्रात त्यांनी म्हटले की, मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतील सर्वांत मूलभूत अधिकारांपैकी एक आहे. या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोगाचे लोकशाही व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे असे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांतील घडामोडींमुळे देशातील नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबत चिंता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेच्या घाईघाईने झालेल्या अंमलबजावणीबाबत आणि काही ठिकाणी झालेल्या कथित त्रुटींबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे कमल हासन यांनी पत्रात म्हटले आहे. मतदार यादीचे संरक्षण आणि शुद्धीकरण करताना कोणत्याही नागरिकाला मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण होता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी खासदारांची संसद परिसरात भेट घेऊन त्यांच्या चिंता ऐकून घ्याव्यात, अशी विनंती कमल हासन यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना केली. ही मागणी कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या वतीने नसून देशाच्या व्यापक हितासाठी केलेले आवाहन आहे, असे त्यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.


























































