
टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा कार्यकाळ नुकताच संपला. त्यांच्या कार्यकाळामध्ये हिंदुस्थानच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीही केली. मात्र खेळाडूंच्या निवडीवरून अनेकदा त्यांना सोशल मीडियावर टीकेचाही सामना करावा लागला. ही टीका मनाला लावून न घेता त्यांनी अनेक धाडसी निर्णयही घेतले. आता त्यांचा कार्यकाळ संपला असून याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच त्यांच्या निर्णयांवर सातत्याने टीका करणाऱ्यांचाही समाचार घेतला.
“आदरणीय अजित भाई, तुमच्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा विषय होता. हिंदुस्थानी संघाने जिंकलेल्या त्या तीन आयसीसी ट्रॉफिज तुमच्या ठाम विश्वासाची आणि जिद्दीची साक्ष देतात. संघ प्रथम आणि संघच सर्वोच्च हा तुमचा दृष्टिकोन नेहमीच राहिला. मी खात्रीने सांगू शकतो की, इतिहास तुमच्यासाठी नेहमीच दयाळपणे वागेल. तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!”, अशी पोस्ट गौतम गंभीर याने केली.
Dear Ajit Bhai, an absolute honour to work with you. Those 3 ICC trophies are testimony of your conviction: Team first & Team ahead, always.. I must say, History will be kinder to you. Thank you for everything. My heartfelt wishes for your future endeavours !! https://t.co/gYQN0fea8X
— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 7, 2026
जुलै 2023 मध्ये मुख्य निवडकर्तेपदाची सूत्रे हातात घेतलेल्या अजित आगरकर यांचा कार्यकाळ हिंदुस्थानी क्रिकेटमधील अत्यंत यशस्वी आणि तितकाच वादळी मानला जातो. त्यांच्या कार्यकाळात हिंदुस्थानने 2024 चा टी-20 विश्वचषक, 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 चा टी-20 विश्वचषक अशा तीन मोठ्या आयसीसी स्पर्धांवर आपले नाव कोरले. याशिवाय 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात उपविजेतेपद पटकावले होते. मात्र, या यशासोबतच आगरकर यांनी घेतलेल्या काही कठोर निर्णयांवरून वादही निर्माण झाले.
कसोटी संघातून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना हळूहळू डावलणे, तसेच 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकून दिल्यानंतरही सूर्यकुमार यादवला संघातून वगळणे यांसारखे मोठे निर्णय आगरकर यांच्याच काळात घेतले गेले. आगरकर यांनी नेहमीच प्रस्थापित नावांपेक्षा तरुण आणि भविष्याचा विचार करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिले. आगरकर यांच्या जाण्यानंतर लगेचच अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला टी-20 संघात पुन्हा बोलावण्यात आले. यामुळे निवड समितीच्या धोरणात झालेला बदल स्पष्ट दिसतो.
बीसीसीआयने मागवले अर्ज
दरम्यान, 4 ऑक्टोबर रोजी आगरकर यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआयने निवड समितीतील रिक्त पदासाठी अधिकृतपणे अर्ज मागवले आहेत. अहवालानुसार, आगरकर यांनी स्वतःच कार्यकाळ वाढवून घेण्यात स्वारस्य दाखवले नव्हते.

























































