
देवळाली प्रवरा येथील कारवाडी परिसरात दोन चिमुकल्या मुलांसह विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने देवळाली प्रवरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वंदना गणेश गाडे (वय 30), जीवन गणेश गाडे (वय 4) आणि चैतन्य गणेश गाडे (वय 6) अशी मृतांची नावे आहेत. आई वंदना यांनी आपल्या दोन मुलांना गळफास देऊन त्यांचा मृत्यू झाल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मृत चैतन्य आत्याकडे शिक्षणासाठी राहत होता. सोमवारी सकाळी तो घरी आला होता. वंदना यांचे पती गणेश जगन्नाथ गाडे हे कामासाठी बाहेर गेले होते. सायंकाळी ते घरी परतले असता घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसले. दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी पत्नी व दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली.
आज सकाळी शवविच्छेदनावेळी वंदनाच्या अंगावरील कपडय़ात सुसाईड नोट आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये पतीकडून मानसिक त्रास होत असल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पती गणेश गाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. राहुरी ठाण्याचे पोलीस
निरीक्षक रवींद्र देशमुख, गणेश लिपणे, सूरज गायकवाड, राहुल यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.































































