सरकारची दडपशाही! राहुल गांधी यांच्यासह 50 खासदारांना फरफटत नेले; दिल्लीत रणकंदन! आठ तासांचे ठिय्या आंदोलन पोलिसांनी चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीसाठी दिल्लीत आज रणकंदन झाले. ‘इंडिया’ आघाडीचे 300 हून अधिक खासदार एकजुटीने रस्त्यावर उतरले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदारांनी निवडणूक आयोगावर धडक मोर्चा काढला. त्यामुळे बिथरलेल्या सरकारने पोलिसांकरवी हा मोर्चा रोखून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तापले. राहुल गांधी पोलिसांना भिडले. बॅरिकेडवर चढले. आकाशवाणी भवनात प्रवेश करून ठिय्या दिला. ‘ज्ञानेश कुमार लय झालं, आता चालते व्हा,’ असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. तब्बल आठ तासांच्या धरणे आंदोलनानंतर पोलिसांनी राहुल यांच्यासह 50 खासदारांना जबरदस्तीने उचलून ताब्यात घेतले.

देशातील कथित निवडणूक घोटाळ्यांचे ज्ञानेश कुमार हेच सूत्रधार असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या विरोधात देशभरात संताप आहे. ‘ज्ञानेश कुमार हटाव’ ही मागणी करत देशभर आंदोलने सुरू आहेत. याच मागणीसाठी ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी आज मोर्चा काढला. ‘इंडिया’ आघाडीचा भाग नसलेल्या व कधीकाळी भाजपचा मित्र असलेल्या बिजू जनता दलानेही आंदोलनात उडी घेतली. त्यामुळे आंदोलनाला अधिकच व्यापक स्वरूप आले. सकाळी 10 वाजता ‘ज्ञानेश हटाव’चे फलक घेऊन आणि ‘व्होट चोर, गद्दी छोड’ अशा घोषणा देत मोर्चा सुरू झाला. आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी काही वेळातच मोर्चा अडवला. त्यामुळे संतापलेल्या खासदारांनी उन्हाची आणि उकाडय़ाची पर्वा न करता संसद मार्गावर ठिय्या दिला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खासदार आणि पोलिसांची झोंबाझोंबी झाली. नेत्यांसह कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.

राहुल, प्रियांकांचा पोलिसांना चकवा

पोलिसांनी खासदारांची धरपकड सुरू केल्याने मोर्चा संपणार असे वाटत असतानाच राहुल गांधी यांनी पोलिसांना चकवा दिला. प्रियांका गांधी यांच्यासह त्यांनी आकाशवाणी भवनाच्या आवारात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ काही खासदारही गेले. तिथे त्यांनी एका झाडाखाली धरणे आंदोलन सुरू केले. पोलिसांनी त्यांना तिथून जाण्यास सांगितले, मात्र राहुल यांनी नकार दिला. आयोगाच्या आयुक्तांना भेटू दिले जात नाही तोपर्यंत इथून हटणार नाही. इथे आम्ही आंदोलन करू नये असे वाटत असेल तर इतर ठिकाणी जागा द्या, अशी मागणी त्यांनी केली. जवळपास आठ तास हे ठिय्या आंदोलन सुरू होते. हळूहळू आकाशवाणी भवन परिसरात खासदारांची संख्या वाढू लागली. मात्र, नंतर अचानक पोलिसांनी राहुल, प्रियांका यांच्यासह सर्व खासदारांना बळजबरीने ताब्यात घेतले व पोलीस व्हॅनमध्ये कोंबले. खासदारांनी पोलिसांना प्रतिकार केल्याने प्रचंड गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता. त्यांना पिंग्सवे कॅम्प येथे ठेवण्यात आले आहे.

सर्व खासदार देश वाचवण्यासाठी उभे ठाकलेत

राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘मोदी-शहा आणि भागवत यांनी देशातील लोकशाही संपवली आहे. देशाला हे कळून चुकले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून मतचोरी करून या सगळ्यांनी देश हायजॅक केला आहे. ते जे काही करत आहेत, तो देशद्रोह आहे. यापैकी कोणीही वाचू शकणार नाही. सगळ्यांना शिक्षा होईल, असे राहुल गांधी यांनी ठणकावले. भाजपच्या टीकेचा त्यांनी जोरदार समाचार घेतला. ‘भाजप माझ्याविषयी काय बोलतो याची मला पर्वा नाही. मी आणि माझे सर्व सहकारी खासदार देश वाचवण्यासाठी उभे ठाकलेत,’ असे राहुल म्हणाले.

‘आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. आम्हाला निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटायचं आहे, पण भेटू दिलं जात नाही. ज्ञानेश कुमार आम्हाला भेटायला का घाबरतायत. लोकप्रतिनिधी निवडणूक आयुक्तांना भेटू शकत नसतील तर ही कसली लोकशाही?’

भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद भवन येथून इंडिया आघाडीचा मोर्चा निघाला. या मोर्चात शिवसेना ताकदीने उतरली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे मोर्चात सहभागी झाले.

मोर्चा रोखल्यानंतर राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी आकाशवाणी भवन येथे ठिय्या देत 8 तास सत्याग्रह केला. पोलिसांनी अमानुषपणे हे आंदोलन चिरडले. राहुल यांना बळजबरीने पकडून पोलीस व्हॅनमध्ये डांबण्यात आले.

मोदी, शहा, भागवतांनी देशाला हायजॅक केले आहे. त्यात ज्ञानेश कुमार यांनी त्यांना मदत केली आहे. हा देशद्रोह असून यातला कुणीही वाचणार नाही. सर्वांवर कारवाई होणार. सबका हिसाब होगा. – राहुल गांधी