
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या मराठी शाळांची दिवसेंदिवस घटत आहे. गेल्या वर्षभरात जिस्हापरिषद शाळांची ४ हजार ५२६ विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जिल्हापरिषदेच्या २१ शाळा बंद झाल्या आहेत. पटसंख्येअभावी सहा खासगी शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा ओस पडत आहेत. शून्य पटसंख्येअभावी अनेक शाळा बंद होत आहेत. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या तब्बल २१ शाळा शून्य पटसंख्येमुळे बंद करण्यात आल्या आहेत. गुरूजी आहेत पण विद्यार्थी नाहीत अशी अवस्था शाळांची झाली आहे. शून्य पटसंख्या असलेल्या शाळांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करून त्या शाळा बंद करण्यात येतात. पटसंख्या घटण्याचा फटका खासगी शाळांना बसला असून २०२५-२६ याकालावधीत ६ खासगी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात शून्य पटसंख्या असलेल्या शाळांतील शिक्षकांचे दुसऱ्या शाळेत समायोजन झाल्यानंतर बंद पडलेल्या शाळांचा आकडा पुढे येणार आहे.
गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी गावागावात, दुर्गम भागात शाळा सुरू करण्यात आल्या. काही गावात शाळा सुरू होण्यासाठी आंदोलने झाली होती. मात्र, बदलत्या काळानुसार शहराकडे वाढलेला ओघ, इंग्रजी माध्यामांच्या शाळांकडे पालकांचा कल, आंतरराष्ट्रीय किंवा सीबीएसई शाळांची वाढती संख्या यामुळे पालक वर्ग आपल्या मुलांना खासगी शाळेत पाठवत आहेत. गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद शाळांचा घसरलेला शैक्षणिक दर्जा, भरती झालेल्या बदली करून घेण्याचे प्रमाण, यामुळेही शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.




























































