
महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याचा खेळखंडोबा सुरू असताना एमपीएससीचे विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संबोधित करताना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “आपली प्रमुख मागणी एकच आहे, ती म्हणजे विवेक भीमनवार यांचा राजीनामा. भीमनवार हलत नाहीत तोपर्यंत आपणही राजीनामा घेतल्याशिवाय हटायचे नाही,” असा निर्धारच त्यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांसमोर केला.
“आपली लढाई एका व्यक्तीविरोधात नाही, तर चुकीच्या व्यवस्थेविरोधात आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणार आणि भीमनवार यांचाही राजीनामा घेणार. हा राग आणि हा लढा केवळ आजपुरता राहता कामा नये. विद्यार्थ्यांची एकजूट कायम राहिली पाहिजे,” असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. “तुमचा आवाज आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. तुमच्या मागण्या स्पष्ट आहेत. त्यातील प्रमुख मागणी भीमनवार यांच्या राजीनाम्याची आहे. भीमनवार ही व्यवस्थेतील प्यादी आहेत. मात्र, त्यांच्या मागे कोण आहे, हा खरा प्रश्न आहे,” असा सवालही यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील रोजगाराच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरताना आदित्य ठाकरे म्हणाले, “एकामागोमाग एक उद्योगधंदे राज्याबाहेर जात आहेत. प्रशासनात जाण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण परीक्षा देत आहेत. मात्र नोकऱ्या कुठे आहेत? अडाणी लोकांना सर्व काही मिळते आणि सुशिक्षित तरुणांना काहीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.” महाराष्ट्रातील तरुण स्पर्धा परीक्षांसाठी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. त्यांच्या हातात पुस्तक, डोळ्यांत स्वप्न आणि प्रशासनात जाऊन राज्याची सेवा करण्याची इच्छा आहे. अशा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे ठाकरे यांनी सरकारला सुनावले.
शेतकऱ्यांना आपल्या पुढच्या पिढीने शेतीत जाऊ नये असे वाटत आहे. मुलांनी शहरात जावे, चांगले शिक्षण घ्यावे, नोकरी करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, शहरात आल्यानंतर नोकऱ्या कुठे आहेत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना ठाकरे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला. “देशासमोर रोजगाराचे मोठे संकट उभे आहे. कोट्यवधी तरुण रोजगाराच्या बाजारात येणार आहेत. त्या तुलनेत रोजगाराच्या संधी किती निर्माण होणार आहेत? शिक्षणपद्धतीत बदल करण्याची गरज आहे,” असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
“सरकारला प्रश्न विचारला की अर्बन नक्षल, दिमागी नक्षल, देशद्रोही ठरवले जाते. पण प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. आपल्या हक्कासाठी आवाज उठवणे हा गुन्हा नाही,” असा टोला ठाकरे त्यांनी सरकारला लगावला. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनात एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन करताना ठाकरे म्हणाले, “तुम्ही पेपर फोडणार, निवडणूक फोडणार, खासदार फोडणार आणि आता विद्यार्थ्यांची एकजूट फोडण्याचा प्रयत्न करणार; पण ही एकजूट फोडू देऊ नका.”
महाराष्ट्रातील नोकऱ्या महाराष्ट्रातच राहिल्या पाहिजेत. प्रशासनातील नोकऱ्या महाराष्ट्रातील तरुणांना मिळाल्याच पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली. पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांना फ्लायओव्हरखाली झोपण्याची वेळ येत असेल तर ही व्यवस्थेची शोकांतिका असल्याचे त्यांनी म्हटले.
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देताना आदित्य ठाकरे म्हणाले, फूट पडू देऊ नका. एकजूट कायम ठेवा. ‘भीमनवार चले जाव’ हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमला पाहिजे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. या मुंबईत आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याचा अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला आहे. राज्यपालांना मी तुमच्या वतीने पत्र दिले आहे. आता सरकारला आणि प्रशासनाला स्पष्ट संदेश द्यायचा आहे. 24 तासांत भीमनवार यांचा राजीनामा झाला नाही, तर आपल्याला मुंबईत येऊन एमपीएससीच्या कार्यालयाच्या दारात यावे लागेल. भीमनवार हलत नाही तोपर्यंत आपण पण हलायचे नाही..

























































