प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांचे निधन; पाच दशकांचा लेखनप्रवास थांबला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात आपल्या गाजलेल्या कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले ब्रिटिश लेखक आणि माजी राजकारणी जेफ्री आर्चर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. प्रकाशन संस्था हार्परकॉलिन्सने दिलेल्या माहितीनुसार, आर्चर यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या शेवटच्या कादंबरी ‘अ‍ॅडम अँड ईव्ह’च्या जागतिक प्रकाशनाच्या अवघ्या एक दिवस आधी समोर आली.

जेफ्री आर्चर यांचा लेखन प्रवास तब्बल पाच दशकांचा होता. त्यांच्या पुस्तकांच्या जगभरात 30 कोटींहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. ‘केन अँड एबल’ ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय कादंबऱ्यांपैकी एक मानली जाते. त्यांच्या नव्या आणि अखेरच्या कादंबरीतही वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील एकाच दिवशी जन्मलेल्या दोन व्यक्तींची कथा मांडण्यात आली आहे. आर्चर यांच्या पश्चात पत्नी डेम मेरी आर्चर, दोन मुले आणि पाच नातवंडे असा परिवार आहे.

आर्चर यांचे पहिले पुस्तक ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ 1976 मध्ये प्रकाशित झाले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आर्थिक संकटाचा या कादंबरीवर प्रभाव असल्याचे सांगितले जाते. चुकीच्या गुंतवणुकीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वतःला सावरले आणि लेखनाच्या माध्यमातून मोठे यश मिळवले. हार्परकॉलिन्सच्या माहितीनुसार, आर्चर यांच्या पुस्तकांनी ब्रिटनमधील ‘संडे टाइम्स’च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांच्या यादीत तब्बल 14 वर्षे 5 महिने स्थान मिळवले. तसेच त्यांच्या पुस्तकांचा ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बेस्टसेलर यादीतील प्रवास पाच वर्षांहून अधिक काळ सुरू राहिला. लेखनासोबतच आर्चर यांची राजकीय कारकीर्दही चर्चेत राहिली. तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या काळात त्यांनी ब्रिटनच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षात आपली ओळख निर्माण केली होती.

जेफ्री आर्चर यांच्या साहित्यामध्ये राजकारण, पैसा, नाती, महत्त्वाकांक्षा आणि समाजातील विविध स्तर यांचा प्रभावी मेळ पाहायला मिळतो. सोपी, वेगवान आणि वाचकाला कथेत गुंतवून ठेवणारी त्यांची लेखनशैली जगभरातील वाचकांना भावली. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे विविध भाषांमध्ये भाषांतर झाले असून त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरल्या आहेत.