
अलिबाग तालुक्यात भूमाफियांनी आपला मोर्चा आता वनविभागाच्या जमिनींकडे वळवला आहे. भूमाफियांनी सुमारे १२ हेक्टर वनजमिनीवर कब्जा करून तिथे अनधिकृत इमले उभे केले आहेत. याप्रकरणी ४० जणांवर गुन्हे दाखल झाले असले तरी त्यांचे अतिक्रमण हटविले जात नाही. वनाधिकाऱ्यांनी या अतिक्रमणांवर कारवाई करण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वाढत्या जंगलतोडीने रायगड जिल्ह्यातील वनसंपदा धोक्यात आलेली असताना वनाचे क्षेत्र वाढविण्याबरोबरच त्याचे संवर्धन करण्यासाठी वनविभाग शर्तीचे प्रयत्न करीत आहे. आता येथील वनसंपदेबरोबरच वनजमिनींवरही भूमाफियांच्या नजरा पडू लागल्या आहेत. काही समाजकंटकांनी वनविभागाच्या जागांमध्ये हातभट्ट्या सुरू केल्या आहेत. शेड बांधून जागेवर बेकायदा कब्जा केला आहे. कुंपण घालून अतिक्रमण केले आहे. अलिबाग तालुक्यात जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथे अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा धडाका या भूमाफियांनी लावला असल्याचे उघड होत आहे.
वन्यप्राण्यांचा अधिवास संकटात
वाढत्या अतिक्रमणामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास संकटात सापडलेला असताना वनाचे क्षेत्र घटण्याची भीतीही निर्माण झाली आहे. वनाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकंनी केला आहे. मात्र वनखात्याने कारवाई सुरू असल्याचा दावा केला आहे. परंतु कारवाई करूनही त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण कसे होते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. वनक्षेत्रात होणारे अतिक्रमण ही बाब खूप गंभीर आहे. कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण
अलिबाग तालुक्यात १२ हेक्टर क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे. वनविभागाने अनेकवेळा कारवाईदेखील केली आहे. ४० जणांविरोधात गुन्हेही दाखल केले आहेत. परंतु तालुक्यात अतिक्रमणाची परिस्थिती जैसे थे अशीच असल्याचे चित्र आहे. वनाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे. त्यामुळे वन विभागाची ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
– अलिबाग तालुक्यात वनाचे १२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. वनसंपदा टिकून ठेवण्याबरोबरच तेथील वन्यप्राण्यांचा अधिवास कायम राहावा यासाठीदेखील वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
– वनविभागातील काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे वनाच्या जागेत खुलेआमपणे अतिक्रमण करून ती जागा बळकावण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत.
– भूमाफियांनी वनविभागाची जमीन हडप करण्यासाठी साग व इतर झाडांची तोड केली आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असली तरी वनविभाग अॅक्शन मोडमध्ये आलेला नाही. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.




























































