
अटक टाळण्यासाठी तक्रारदाराकडे 1 लाख 30 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यातील पीएसआयला अटक करण्यात आली आहे. लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने पीएसआयला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुले पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पराडे असे अटक केलेल्या लाचखोर पोलिसाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या दोन बहिणींना अटक न करण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी पीएसआय ज्ञानेश्वर पराडे याने 1 लाख 50 हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर 1 लाख 30 हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे एसीबीने सापळा रचून 5 ऑक्टोबर रोजी ज्ञानेश्वर पराडेला 1 लाख 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



























































