विद्यार्थ्यांची फ्रेंच क्रांती! 400 शाळा बंद!! हजारो तरुण रस्त्यांवर… ठिकठिकाणी जाळपोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रान्समध्ये शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरसोयींविरोधात फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांच्या संतापाचा स्फोट झाला आहे. शिक्षण व्यवस्थेविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले आहे. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी 24 शाळांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून देशातील 400 ते 500 माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

फ्रान्समध्ये शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्न घेऊन हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मागील आठवडय़ात पॅरिसमध्ये सुरू झालेली ही निदर्शने आता मॉन्टपेलियर, नँट्स आणि मार्सेली यासारख्या अन्य शहरात सुद्धा पोहोचली आहेत. देशात शिक्षकांची कमतरता, वर्गामध्ये जास्तीची विद्यार्थी संख्या आणि जीर्ण झालेल्या इमारती वाढल्याने विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले आहे. फ्रान्समध्ये 3 हजार 700 शाळांपैकी 735 शाळांना हिंसक निदर्शनांचा फटका बसला आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 78 शैक्षणिक कर्मचारी जखमी झाले आहेत. हे आंदोलन सुरू झाल्यापासून आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून यातील 85 टक्के तरुण हे अल्पवयीन आहेत. विद्यार्थी आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार पुढील पावले उचलत आहे, असे फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी सांगितले. सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना जाहीर केली नाही, असा आरोप करत आंदोलनकर्त्या संघटनांनी मंगळवारीही आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

सरकारचे सर्रास दुर्लक्ष

हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शिक्षण व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एका वर्गात 40 विद्यार्थ्यांना बसवले जात आहेत. शेकडो शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षक भरती खोळंबली आहे. सरकारी शाळांमध्ये एसीची व्यवस्था केली जात नाहीय. फ्रान्समध्ये असलेल्या प्रचंड गर्मीमुळे विद्यार्थ्यांना 35 ते 40 सेल्सिअंश डिग्री तापमान असलेल्या बंद खोलीत परीक्षा द्यावी लागत आहे. यामुळे विद्यार्थी वैतागले आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत राहावे लागत आहे.