
देशभर बेधुंदशाही सुरू आहे. कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. एकाच बाजूने ‘मन की बात’ सुरू आहे, जणू काही दुसऱ्या बाजूला मनच नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर भाष्य केले. तुमची वेदना मी समजू शकतो असे म्हणत ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील वर्षे वाया गेल्यानंतर कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते यावर भाष्य केले. तुमच्याकडे पेपर फुटताहेत आमच्याकडे मतं फुटताहेत असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले. यावेळी ते म्हणाले, मी तुमच्या रागात सामील व्हायला आलोय, तुम्हाला आलेला हा राग तात्पुरता असता नये.
महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. धार्मिक आणि जातीय मुद्द्यांमध्ये तरुणांना अडकवले जात असल्याचे सांगत ते म्हणाले, “धार्मिक गोष्टींमध्ये तुम्हाला अडकवलं जातंय. जातीमध्ये द्वेष करा, एकमेकांना मारा, याच्यातच तुमचा वेळ गेला तर घरी जाऊन आई-वडिलांना काय तोंड दाखवणार?” “तुम्हाला तुमचे आई-वडील कसे शिकवत असतील, याची कल्पना करा. प्रश्न इतके निर्माण झाले आहेत. यातून आधी बाहेर या,” असे आवाहनही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
एमपीएससीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून विद्यार्थी पुण्यात आले आहेत. मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत राज ठाकरे यांनी पेपरफुटीसह विविध समस्यांवर भाष्य केले. विद्यार्थ्यांनी आपला संताप कायम ठेवण्याचे आवाहन करत राज ठाकरे म्हणाले, “मला असं वाटतं की हा तुमचा राग कायम असणं गरजेचं आहे. मी तुमच्याशी जे बोलत आलोय ते सत्य असतं, म्हणून कडवट असतं.” विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करून परिस्थिती आणि वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील नोकऱ्या या महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींना मिळाल्या पाहिजेत,” अशी भूमिका देखील ठाकरे यांनी यावेळी मांडली. महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींसाठी राज ठाकरेला कोणाचेही पाय धरावे लागले तर राज ठाकरे तयार आहे. पण तुमचा सरकारवर दबाव वाढला पाहिजे, असे म्हणत राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला.
खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि आरक्षणाच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. “सर्व गोष्टी खासगी होत चालल्या आहेत. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. तुमचा विचारच नाही. तुम्हाला गृहीत धरलं आहे सर्वांनी,” असे यावेळी राज ठाकरे म्हणाले.


























































