ठाण्याच्या किसननगरात इमारतीचा भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही; ८० रहिवाशांचे स्थलांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वागळे इस्टेटमधील किसननगर परिसरातील एका इमारतीचा गॅलरीचा भाग आज दुपारी अचानक कोसळला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींचे मोठे नुकसान झाले. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून इमारतीमधील ८० रहिवाशांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले आहे.

ठाण्याच्या किसननगर येथील पोलीस चौकीसमोर असलेल्या संगम सदन इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला असल्याची माहिती दुपारी अडीच वाजता ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. ही इमारत तळमजला अधिक तीन मजली असून सुमारे २८ वर्षे जुनी आहे. इमारतीमध्ये २७ सदनिका आणि चार गाळे असून सुमारे ८० रहिवासी वास्तव्यास आहेत. दुपारी अचानक गॅलरीचा सज्जा कोसळून खाली पार्क केलेल्या चार दुचाकींचे नुकसान झाले. त्यामध्ये दोन होंडा अॅक्टिव्हा, एक होंडा हॉर्नेट आणि एका ज्युपिटरचा समावेश आहे.

निवासाची व्यवस्था हाजुरी रेंटल बिल्डिंगमध्ये

गॅलरीचा उर्वरित भाग धोकादायक असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली. येथील कुटुंबांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था हाजुरी येथील रेंटल इमारतीत करण्यात आली. उर्वरित रहिवाशांनी नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.