पालिकेचा पहिला ‘स्ट्राँगमॅन’ प्रदीप सावंत सेवानिवृत्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेचा पहिला स्ट्राँगमॅन आणि ‘बी’ विभागातील वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक प्रदीप रघुनाथ सावंत हे 35 वर्षांच्या प्रदीर्घ पालिका सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. प्रदीप सावंत यांनी पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग क्रीडा क्षेत्रातील जिल्हा, राज्य पातळीवरील रौप्य, सुवर्ण पारितोषिक पटकावले होते.

मूळचे मालवणातील त्रिंबक गावचे रहिवासी असलेले प्रदीप सावंत यांनी वरळीच्या ससमिरा आरोग्य केंद्रातून नोकरीची सुरुवात केली होती. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक पदापर्यंत पोहोचले. त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा बी विभाग कार्यालयात वैद्यकीय अधिकारी विभाग डॉ. अविनाश जोगदंड, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धी कोळी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रशासकीय अधिकारी सुचिता पाटील यांच्या हस्ते प्रदीप सावंत यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात रौप्य, सुवर्णपदक पटकावूनदेखील ते दुर्लक्षित राहिले. त्यांच्या योगदानाची दखल घेत पालिका प्रशासनाने त्यांना एकही वेतनवाढ दिली नाही. बढती तर सोडा पालिकेचा गुणवंत कामगार म्हणून सत्कारही केला नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.