
वेगवान गोलंदाज मुकेशपुमारने चेंडू हातात घेतला आणि जम्मू-कश्मीरच्या फलंदाजीची अक्षरशः दाणादाण उडवली. त्याच्या भेदक माऱ्यापुढे यजमानांचा डाव अवघ्या 111 धावांत आटोपला आणि शेष हिंदुस्थानने तब्बल 167 धावांनी विजय मिळवत इराणी करंडकावर आपले नाव कोरले.
या विजयाचा पाया मात्र फलंदाज रविचंद्रन स्मरणने रचला. पहिल्या डावात 68 धावा केल्यानंतर त्याने दुसऱ्या डावात तब्बल 135 धावांची शतकी खेळी केली. संघाची अवस्था 197 धावांवर आठ विकेट अशी बिकट असताना स्मरणने किल्ला लढवत शेष हिंदुस्थानचा डाव सावरला. अखेर संघाने 319 धावा केल्या आणि जम्मू-कश्मीरसमोर 279 धावांचे आव्हान उभे राहिले.
दुपारनंतर अवघ्या 22 धावांत जम्मू-कश्मीरच्या शेवटच्या सात विकेट पडल्या. मुकेशकुमारने 33 धावांत सहा विकेट, तर आकाश दीपने 25 धावांत तीन विकेट घेत शेष हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुकेशचा विकेट्सचा षटकार
लक्ष्याचा पाठलाग करताना कमरान इक्बाल आणि शुभम खजुरिया यांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी करत दमदार सुरुवात केली. मात्र आकाश दीपने कमरानला बाद करताच सामन्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर मुकेशपुमारने अक्षरशः हाहाकार माजवला. शुभम पुंडीरला पायचीत करत पुढच्याच चेंडूवर परस डोगराचा त्रिफळा उडवला. आकाश दीपने शुभम खजुरियाला बाद केले. त्यानंतर मुकेशने कान्हैया वधावन, अब्दुल मुश्ताक, उमर नझीर आणि सुनील यांना माघारी धाडत आपला विकेट्सचा षटकार पूर्ण केला.





























































