
Asian Games 2026 चा धुरळा गेले 16 दिवस सुरू होता. खेळाडूंनी पदकांची लयलूट करत अनेक विक्रम प्रस्थापित केले. तर काही खेळाडूंना रिकाम्या हाताने स्पर्धेला रामराम ठोकावा लागला. जपानमधील एची-नागोय येथे ही स्पर्धा दिमाखात पार पडली आणि आज 4 ऑक्टोबर स्पर्धेची सांगता झाली. या स्पर्धेत चीनने सर्वाधिक पदकांची कमाई करत पदकतालिकेत आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
नागोया सिटीच्या मिजुहो पार्क अथलेटिक स्टेडियममध्ये झालेल्या या भव्य समापन सोहळ्यात हिंदुस्थानची स्टार शूटर नीरू धांडा हिने हिंदुस्थानची ध्वजवाहक म्हणून तिरंगा फडकवला. या स्पर्धेत नीरूने उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकासह एकूण तीन पदके आपल्या नावावर केली. या समापन सोहळ्यानंतर ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचा (OCA) अधिकृत ध्वज आगामी एकविसाव्या आवृत्तीचे यजमानपद भूषवणाऱ्या कतर देशाच्या प्रतिनिधींकडे सोपवण्यात आला.
एशियन गेम्समध्ये चीनने प्रथम क्रमांक पटकावला असला तरी, हिंदुस्थानच्या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी करत एकूण 85 पदकांची कमाई केली. यामध्ये 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश असून, 21 सुवर्णपदके जिंकणाऱ्या उज्बेकिस्तानला मागे टाकत हिंदुस्थानने पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. या स्पर्धेत चीनने सर्वाधिक 341 पदकांसह (169 सुवर्ण) प्रथम स्थान मिळवले, तर जपान दुसऱ्या आणि दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर राहिले.
































































