
बांगलादेशींच्या नावाखाली जर माझ्या देशातील नागरिकांचे मतदानाचे अधिकार काढून घेत असाल तर आज पाऊल उचललं आहे, पुढे हात उचलावा लागेल. अशा कडक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर बरसले. देशात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेतील घोळ, मतदार यादींमधील गडबड घोटाळ्याचे वृत्त, निवडणूक आयोगातील आयुक्तांमध्ये पडलेल्या फूटीच्या बातम्यानंतर देशातील मतदारांमध्ये प्रचंड संताप आहे. आपला मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याच्या काळजीतून मुंबईकरांसह महाराष्ट्रातील नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मुंबईत गर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. या गर्दीला उद्देशून भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगातील घोटाळ्यांना लक्ष्य करत जोरदार गर्जना केली.
”हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा, धर्माचा, जातपातीचा लढा नाही तर हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा लढा आहे. मोदीजी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी MAKE IN INDIA अशी घोषणा दिला होती. पण या Make in india मध्ये जर हुकुमशहा पण आपल्या देशात बनणार असेल तर त्यांना या देशातच गाडण्यासाठी आम्ही उभे राहिलो आहोत”, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिला.
”संपूर्ण देशात तेरा कोटी मतदार वगळले आहेत. बंगालमधून, तामिळनाडूतून असं सर्व राज्यातून तेरा कोटी मतदार वगळले. तेरा कोटी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या. इतके मतदार यांनी देशातून वगळले. बंगालमध्ये सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळी जे 30 लाख वगळले गेले त्यांतील काहींनी नंतर अर्ज केले तेव्हा ते वैध ठरले. आता तिथे पोटनिवडणूका आहेत. आता त्या मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा त्यासाठी ते मतदार सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा न्यायधीशांना दिलं ढकलून. 6 तारखेला निवडणूक आहे आणि सर्वोच्च न्यायालय म्हणतो की पोटनिवडणूक आहे आम्ही 5 तारखेला सुनावणी घेऊ. सुनावणी झाली तरी ते मतदार मतदान करू शकणार की नाही काहीच माहित नाही. यांनी सगळ्या संस्था आपल्या ढेंगेखाली कशा घेतल्या त्याचे हे उत्तम उदाहरण आहे” , असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांची नेमणूक पक्षपातीपणे
”माझा पहिला आक्षेप ज्ञानेश कुमार यांच्या नेमणूकीलाच आहे. जो आयुक्त संपूर्ण देशाच्या निवडणूकीवर लक्ष ठेवतो त्याची निवडणूक न होता नेमणूक होते. आमच्या देशाच्या राष्ट्रपतींची देखील निवडणूक होते. तर मग निवडणूक आयुक्तांची निवडणूक का होत नाही? ती नेमणूक का होते? या नेमणूकीच्या समितीवर आधी सरन्यायधीश होते, विरोधी पक्षनेते होते. पण नंतर सरन्यायधींशांना काढून टाकलं व त्यांच्या जागी पंतप्रधानांच्या मर्जीतले मंत्री नेमले गेले. म्हणजेच सध्या या समितीवर अमित शहा आहेत. त्यामुळे त्या कमिटीत आता एक विरोधात दोन झाले आहे. राहुल गांधींनी ज्ञानेश कुमार यांच्या नेमणूकीला विरोध केला पण तरिही त्यांची नेमणूक झाली. त्यांची नेमणूकच पक्षपातीपणे झाली आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
इंडिया अंगेस्ट व्होट चोर
”आर के सिंह त्यांनी असं सांगितलं की हा SIR गैरकायदा आहे. निवृत्त न्यायमूर्ती धुलिया यांनी सांगितलं की नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा नाही तो गृहमंत्र्याचा आहे. हा ज्ञानेश कुमारच्या बापाचा अधिकार आहे. अमित शहाचा हा अधिकार ते ज्ञानेश कुमारच्या माध्यमातून वापरत आहे. काय थट्टा सुरू आहे का हे? इंडिया अंगेस्ट व्होट चोर ही घोषणा पूर्ण गल्लीगल्लीत गेली पाहिजे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपला सरकार चालवता येत नाही
”माझ्या देशातले जवान हे भारतमातेच्या रक्षेसाठी सीमेवर जातात. ही लोकं सरदार वल्लभभाई पटेल यांचा डंका पिटत असतात. ते पोलादी पुरुषच होते. त्यांनी आपला प्रांत निजामाच्या तावडीतून सोडवण्यासाठी मराठवाड्यात सेना घुसवली होती. तर या लोकांनी बंगालमध्ये एका महिलेविरोधात स्वत:चा पक्ष जिंकवण्यासाठी, लढण्यासाठी फौज घुसवली होती. ही यांची लोकशाही. अशा लोकशाहीबद्दल शिवसेनाप्रमुख म्हणायचे की ही यांची दळभद्री लोकशाही मी मानत नाही, याला गाडून टाकल्याशिवाय मी राहणार नाही. लोकशाही पवित्र पाहिजे. भाजपला सरकार चालवता येत नाही. प्रशासन आणि भाजप दोन विरुद्धार्थी शब्द आहे. सरकारचं काम काय पाहिजे? कायदा सुव्यवस्था राखणं. हे जे करत आहेत त्याला देश चालवणं नाही तर सूड उगवणं म्हणतात. काल आमच्या पूर्णेकरांची हत्या झाली. कुठेयत गृहमंत्री ? काय झक मारतायत तुमचे पोलीस. देशभरात महिलांवर अत्याचार सुरू आहेत. कुठे आहे तुमचं हिंदुत्ववादी सरकार. हे तुमचं हिंदुत्व”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.
… तर रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल
”आज संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे. शेतीवर अवलंबून असलेला अन्नदात्याची परिस्थितीचा आपण विचार नाही करू शकत. छत्रपती संभाजीनगरमधील जिजाबाई कचाटे यांची बातमी आलेली. कचाटे यांनी त्यांच्या शेतात घेतलेली सोयाबीन, मका, मिरची सगळी पिकं या दुष्काळात गेली. त्यामुळे त्यांच्या मुलाने शेतात आत्महत्या केली. ज्या शेतामध्ये त्यांनी आपलं भविष्य बघितलं त्याच शेतात त्यांना त्यांच्या पोराची चिता पेटवावी लागली. त्या सांगतात की जेव्हा वारा येतो तेव्हा पोराची राख संपूर्ण घरावर पसरते. त्यांचं दुख सांगण्यासाठी आज माझ्याकडे शब्द नाहीत. अशा लोकांकडे कुणी जात नाही, यांना फक्त पक्ष फोडायचे आहेत. राम मंदिराची दानपेटी चोरणारे तुम्ही, पक्ष फोडणारे षंड आहात तुम्ही. ज्ञानेश कुमार हे त्यांचं हत्यार आहे. आधी निदान मत देण्याची तरी चोरी नव्हती. आता मताची चोरी होऊ लागली आहे. आमच्या मतदानाचा अधिकार देखील काढून टाकायला लागले आहेत. न्यायसंस्था, प्रशासन, इतर संस्था तुम्ही ताब्यात घेतल्या असतील पण हे रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत. या रस्त्यावर तुम्हाला फिरणं मुश्कील होऊन जाईल”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
देत तर काही नाही नुसतं ओरबाडून घेतायत
”तुमचा एवढा मोठा पक्ष आहे. एवढं चांगलं काम करताय. एवढ्या बहुमताने निवडून येताय तरी जे काँग्रेसला नाही जमलं ते भाजपने करून दाखवलं. जेवढ्या शिव्या या पंतप्रधानांना पडल्या तेवढ्या आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांना पडल्या नसतील. आता लोकांना भिती वाटतेय की जर यांच्या बाजूने बोललो तर कुठून तरी खाडकन कानाखाली बसेल. ही भिती आपण वाढवली पाहिजे. या लोकांनी जनतेला दिलं तर काही नाही नुसतं ओरबाडून घेतलं आहे. त्यासाठी हा लढा आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले
… तर भविष्यात आम्हाला हात उचलावा लागेल
”बांगलादेशींना शोधणे हे SIR चे उद्दिष्ट असल्याचे यांनी सांगितले होते. मग सांगा, महाराष्ट्रातून वगळलेल्या दोन कोटींमधून किती बांगलादेशी सापडले? आम्ही त्यांना हाकलून देतो. त्यांना सीमेवर पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो. पण देशाच्या सीमा केंद्राच्या हातात आहेत. बांगलादेशींना आपल्या देशात घुसू कुणी दिले? राहू कुणी दिले? जर बांगलादेशींच्या नावाखाली माझ्या देशातील नागरिकांचे मतदानाचे अधिकार काढून घेत असाल तर आज पाऊल उचलले आहे, पुढे हात उचलावा लागेल”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच आता जनता शांत आहे पण जर जनता पेटली तर तुमचं सिंहासन जळून खाक करतील, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी दिलं हिटलरचं उदाहरण
”हिटलर कुणालाही घाबरत नव्हता पण त्याला स्वत:च स्वत:वर गोळी झााडून आत्महत्या करावी लागली. त्याने हजारो लाखो लोकं मारली होती, नरसंहार केला. पण तो हिटलर गेला. जे अधिकारी हिटलरच्या पापात सामिल होते त्यांना शोधून काढून त्यांच्यावर खटले भरले गेले. काहींना फासावर लटकवलं काहींना तुरुंगात टाकलं. हे या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी दिलं हिटलरचं उदाहरण
”हिटलर कुणालाही घाबरत नव्हता पण त्याला स्वत:च स्वत:वर गोळी झााडून आत्महत्या करावी लागली. त्याने हजारो लाखो लोकं मारली होती, नरसंहार केला. पण तो हिटलर गेला. जे अधिकारी हिटलरच्या पापात सामिल होते त्यांना शोधून काढून त्यांच्यावर खटले भरले गेले. काहींना फासावर लटकवलं काहींना तुरुंगात टाकलं. हे या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्ञानेश कुमारांसोबतच त्यांच्या सूत्रधारांनाही रस्त्यावर शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही
”जे इथले स्थानिक पातळीवर BLO वगैरे आहेत त्यांना कुणाला वैध अवैध ठरवण्याचा अधिकार नाही. ते ज्ञानेश कुमार ठरवणार, हा देश काय ज्ञानेश कुमारच्या बापाचा आहे. ज्ञानेश कुमारची नेमणूक पक्षपातीपणे केली आहे. ते तर आहेच पण या सगळ्यात एक गोष्ट मागे पडली ती म्हणजे या सरकारने ज्ञानेश कुमारला जे संरक्षण दिलं आहे ते. तसं संरक्षण राष्ट्रपतींना देखील नाही. ज्ञानेश कुमारने काहीही केलं तरी भविष्यात कधीच त्याच्यावर खटला दाखल होऊ शकणार नाही. ज्ञानेश कुमारला सर्व बाजूने संरक्षण दिलं आहे. तू चोरी कर, पोलीस आपलेच आहेत. मनमानीपणे जर कारभार करणार असेल तर देशातील जनता ज्ञानेश कुमारला शिक्षा करेलच सोबत त्यांच्या सूत्रधारांना कायद्याच्या चौकटी रस्त्यावर खेचून शिक्षा दिल्या शिवाय राहणार नाही. दुष्काळ पडलाय. उन्ह खूप आहे, सूर्य आग ओकतोय. जमीन तापलीय. पण असंच गरम होऊन चालणार नाही. या अत्याचाराविरोधात तुम्ही पेटून उठत नाही, तुमची डोकी तापत नसतील तर काही उपयोग नाही. डोकी तापली तरच ही एकजूट, वज्रमूठ सत्ताधाऱ्यांचं बूड शेकल्याशिवाय राहणार नाही” असे उद्धव ठाकरे म्हणाले.



























































