
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री नुसरत भरूचा हिच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. कामाच्या निमित्ताने आणि सुट्ट्यांच्या आनंद घेण्यासाठी बालीला गेलेल्या नुसरतसोबत तिथे एक दुर्दैवी अपघात घडला आहे. या अपघातात तिच्या मणक्याला (Spine) गंभीर दुखापत झाली असून, सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभिनेत्रीच्या टीमने एका अधिकृत निवेदनातून तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. नुसरत सध्या बाली येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. या अपघाताची तीव्रता पाहता तिला एअर ॲम्बुलन्सद्वारे बालीहून थेट मुंबईत आणण्याची तयारी सुरू आहे, जिथे तिच्यावर मणक्याची महत्त्वाची सर्जरी केली जाईल. या गंभीर दुखापतीमुळे आणि विश्रांतीच्या गरजेमुळे नुसरतचे आगामी काही आठवड्यांतील सर्व प्रोजेक्ट्स आणि वर्क कमिटमेंट्सवर याचा परिणाम होणार आहे. वेळेवर काम पूर्ण न झाल्यामुळे तिला मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
View this post on Instagram
या कठीण काळात नुसरतच्या प्रकृतीला प्राधान्य देत, तिच्या टीमने सर्वांना विनंती केली आहे की या काळात तिच्या गोपनीयतेचा (Privacy) सन्मान करावा. तिला उपचारावर आणि पूर्ण रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडे मोकळे वातावरण आणि वेळ देणे गरजेचे आहे. तिच्या तब्येतीबद्दलची पुढील माहिती तिच्या चाहत्यांपर्यंत योग्यवेळी पोहोचवली जाईल असेही टीम कडून सांगण्यात आले आहे.
नुसरत भरूचने तिच्या अभिनय प्रवासात ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आगामी काळात ती अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग असणार आहे. सध्या तिचे चाहते आणि हितचिंतक ती लवकरात लवकर पूर्णपणे बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.




























































