धावीर महाराज मंदिराचा सभामंडप, प्रदक्षिणा मार्ग नव्याने बांधणार, 2 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमाम रोहेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या धावीर महाराज मंदिराचा सभामंडप तसेच प्रदक्षिणा मार्ग नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 2 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंदिराच्या समोरच भव्य सभामंडप तसेच प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग बांधणार असून त्याचा शुभारंभ घटस्थापनेच्या दिवशी 11 ऑक्टोबरला होणार आहे. या प्रकल्पात भाविकांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या जाणार आहेत.

धावीर महाराज मंदिर केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. उत्सवाच्या काळात पोलीस दलाच्या वतीने महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली जाते. विविध ठिकाणांहून हजारो भक्त उत्सव काळात येतात. धावीर महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या दिमाखात होतो. धार्मिक व ऐतिहासिक परंपरेला साजेसा असा सुसज्ज सभामंडप असावा आणि प्रदक्षिणा मार्ग बांधावा, अशी मागणी भक्तांनी केली होती.

सागाचे खांब आणि कौलारू छप्पर

जिल्हा प्रशासनाने भाविकांची मागणी मान्य केली असून सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग बांधण्यास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सभामंडपाचे खांब सागाचे असून त्यावर कौलारू छप्पर टाकण्यात येईल. या दोन्ही प्रकल्पांमुळे धावीर महाराज मंदिर परिसराच्या वैभवात भर पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.