डोंबिवली रेल्वे स्थानकाचा परिसर फेरीवालामुक्त करा, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे स्थानकापासून 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असल्याने हा परिसर तातडीने फेरीवालामुक्त करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजित सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून 150 मीटर परिसर फेरीवालामुक्त असणे आवश्यक आहे. मात्र डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात आजही मोठ्या प्रमाणात फेरीवाले व्यवसाय करत असल्याचे सावंत यांनी निवेदनात नमूद केले आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असून संबंधित अधिकाऱ्यांचा वचक नसल्यामुळे फेरीवाले कारवाईला जुमानत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणामागे आर्थिक व्यवहार होत असून या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन केले होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्यापही परिस्थितीत अपेक्षित बदल झाला नसल्याचे आढळून आले आहे.