
कर्णकर्कश आवाजाने कानठळ्या बसवणाऱ्या सायलेन्सरचा ‘आवाज’ वाहतूक शाखेने दाबला आहे. खारघर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल 61 बुलेट आणि स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलफरोज मुजावर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
अनेक दुचाकीस्वार कंपनीने बसविलेला मूळ सायलेन्सर काढून त्याऐवजी मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर बसवतात. त्यामुळे कर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना अशा कर्कश आवाजाचा मनस्ताप होतो. तसेच रात्री-अपरात्री होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाहतूक शाखेकडे प्राप्त झाल्या होत्या.
61 मॉडिफाइड गाड्या जप्त
खारघर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून 61 मॉडिफाइड सायलेन्सर असलेल्या बुलेट व स्पोर्ट्स बाईकवर दंडात्मक कारवाई केली. कारवाई करण्यात आलेली वाहने वाहतूक शाखेत जप्त केली. मॉडिफाइड सायलेन्सर लावून कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कडक कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी अशा वाहनांची माहिती वाहतूक पोलिसांना द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलफरोज मुजावर यांनी केले.


























































