सत्तरीत पोहोचलेली विविध भारती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

भारतातली सर्वात लोकप्रिय नभोवाणी वाहिनी म्हणजे ‘विविध भारती.’ ‘देश की सुरीली धडकन’ अशी समर्पक टॅग लाइन असलेली ‘विविध भारती’ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली आहे. संगीत आणि करमणुकीचे विविधरंगी कार्यक्रम प्रसारित करणारी आकाशवाणीची  ‘विविध भारती’ सेवा 3 ऑक्टोबर 1957 रोजी सुरू झाली. उद्या आपल्या सेवेची 69 वर्षे पूर्ण करून  ‘विविध भारती’  70 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. याच दिवशी ‘ऑल इंडिया रेडिओ’चे ‘आकाशवाणी’ असे नामकरण करण्यात आलं होतं.

डाॅ बी. व्ही. केसकर हे मराठमोळे केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री असताना भारतात आकाशवाणीच्या  सेवेचा  विस्तार झाला. 1951 ते 1961 या त्यांच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत देशभरात आकाशवाणीची अनेक केंद्रे कार्यान्वित झालीत. त्यावेळी आपल्या शेजारच्या श्रीलंकेतलं  ‘रेडिओ सिलोन’ हे केंद्र भारतीय श्रोत्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होतं. यावर निरनिराळय़ा उत्पादनांच्या जाहिरातीही प्रसारित व्हायच्या. महत्त्वाचं म्हणजे हिंदी चित्रपट संगीत आणि सुगम संगीताचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करून ‘रेडिओ सिलोन’ श्रोत्यांचं भरपूर मनोरंजन करीत होतं. याचा प्रसारण दर्जाही उत्तम होता. यावरून प्रसारित होणारे अनेक कार्यक्रम लोकप्रिय झाले होते. यातला सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे बिनाका गीतमाला. हा कार्यक्रम सादर करणाऱ्या अमीन सयानी  यांची ‘निवेदनाच्या विश्वातले महानायक’ अशी ओळख कालांतराने प्रस्थापित झाली. ‘रेडिओ सिलोन’च्या लोकप्रियतेला शह देण्यासाठी आणि भारतीय श्रोत्यांना आकर्षित करण्यासाठी ‘विविध भारती’ची निर्मिती करण्यात आली.

प्रारंभीच्या काळात हिंदी चित्रपट संगीताचे फारसे कार्यक्रम विविध भारतीवरून प्रसारित होत नव्हते. परिणामी श्रोते ‘रेडिओ सिलोन’ अधिक ऐकतात असं आकाशवाणीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं. नव्या हिंदी चित्रपटांची गाणी ‘रेडिओ सिलोन’वर लगेचच वाजवली जायची. विविध भारतीवर मात्र उशिराने यायची. हा दोष मग दूर करण्यात आला. सुरुवातीला ‘विविध भारती’चं प्रसारण लघु लहरींवरून व्हायचं. त्यामुळे प्रसारण स्पष्ट ऐकू यायचं नाही. पुढे मध्यम लहरींवरून प्रसारण सुरू झाल्याने प्रसारणाचा दर्जा सुधारला. चिंतन (सुविचार), वंदनवार (भक्तिसंगीत), झरोखा,  तेरे सुर और मेरे गीत, भूले बिसरे गीत, संगीत सरिता ( शास्त्राrय संगीतावर आधारित), त्रिवेणी (संदेश गीतांवर आधारित), मनचाहे गीत (श्रोत्यांच्या पसंतीची गाणी), एसएमएस के बहाने व्हीबीएस के तराने, सदाबहार नग्मे, चित्रलोक (नवी चित्रपट गीते), हवामहल (विनोदी श्रुतिका), जयमाला (सैनिकांच्या आवडीची गाणी), विशेष जयमाला (सिनेकलाकाराकडून सादरीकरण), आज के फनकार, नाटय़ तरंग, गाने सुहाने, म्युझिक मसाला (गैर फिल्मी गाणी), छायागीत (उद्घोषकाच्या आवडीची गाणी), सखी-सहेली, पिटारा अंतर्गत  सेल्युलाईड के सितारे, युथ एक्सप्रेस, आज के मेहमान, सरगम के सितारे, हलो फरमाईश, सेहतनामा, पॉप हंगामा, गुलदस्ता (गजल), उजाले उनकी यादो के, विविधा (साप्ताहिक पत्रिका) आणि बेला के फूल यासारख्या मनोरंजन, शिक्षण आणि प्रबोधन करणाऱया कार्यक्रमांच्या बहारदार सादरीकरणामुळे ‘विविध भारती’ला अमाप लोकप्रियता प्राप्त झाली. तसेच एफएम रेडिओच्या उपलब्धतेमुळे  ‘विविध भारती’ची व्याप्ती वाढून ती देशाच्या कानाकोपऱयात पोहचली. ‘विविध भारती’ ने 2007 मध्ये आपल्या स्थापनेची पन्नाशी साजरी केली. हा सोनेरी कालखंड होता, असं म्हणायला हरकत नाही.

2014 नंतर मात्र परिस्थिती झपाटय़ाने बदलू लागली. इतर पेंद्रांप्रमाणेच ‘विविध भारती’वरही सरकारी कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली. प्रामुख्याने मनोरंजनासाठी स्थापन झालेल्या ‘विविध भारती’वर आधी दिवसांतून मोजकीच बातमीपत्रं प्रसारित व्हायची. आता मात्र जवळपास सर्वच बातमीपत्रं प्रसारित होतात. तसेच काही लोकप्रिय  कार्यक्रमही बंद करण्यात आले आहेत. अलीकडेच ‘पिटारा’अंतर्गत रोज प्रसारित होणारे वेगवेगळे कार्यक्रमही थांबवण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्वीची सुश्राव्य ‘विविध भारती’  आता तशी राहिली नाहीये, असं प्रकर्षाने जाणवत आहे. भारतीय प्रसारण सेवेचा संपन्न वारसा जपणारी ‘विविध भारती’ लयास जातेय की काय अशी शंका येतेय. शासकीय ध्येयधोरणाचा, योजनांचा, सरकारच्या उपक्रमांचा प्रसार आणि प्रचार करणारी यंत्रणा असं काहीसं ‘विविध भारती’चं स्वरूप सध्या झालं आहे.

सरकारने बातम्या आणि तत्सम कार्यक्रमांसाठी वेगळी वाहिनी सुरू केली आहे. त्यावर सरकारी ध्येयधोरणांची, योजना-उपक्रमांची चर्चा करणारे कार्यक्रम प्रसारित होतात. शिवाय इतरही वाहिन्यांवर वेळोवेळी सरकारी कार्यक्रम सुरू असतातच. यास्तव ‘विविध भारती’ वर फक्त माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमच प्रसारित व्हायला हवेत. इतर आकाशवाणी पेंद्रे आणि ‘विविध भारती’ यांच्यात फरक आहे. हा फरक आणि याचे वेगळेपण नाहीसे होत आहे. ते जपण्याची गरज आहे. इतक्या पेंद्रांवरून नियमितपणे बातम्या दिल्या जातात त्यामुळे ‘विविध भारती’वर नाही दिल्या गेल्या तर काय फरक पडणार आहे? सरकारने याचा विचार केला पाहिजे. ‘विविध भारती’चे  स्वरूप आणि उद्देश लक्षात घेता यात पेंद्र सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असायला हवा. ‘विविध भारती’ला स्थापनेपासून देण्यात आलेली स्वायत्तता पुन्हा बहाल करण्याची गरज आहे. महानगर आणि शहरांमध्ये उगवलेल्या अनेक खासगी एफ. एम. वाहिन्यांच्या भाऊगर्दीत ‘विविध भारती’ने आजही आपलं वेगळेपण जपलं आहे. उद्या सत्तराव्या वर्षात पदार्पण करणाऱया ‘विविध भारती’कडे असंख्य आठवणींचा खजिना आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक महान कलावंतांच्या मुलाखती, त्यांनी सादर केलेले कार्यक्रम म्हणजे ‘विविध भारती’ने जपलेला संपन्न आणि समृद्ध वारसा होय. हा वारसा नव्या पिढीला मार्गदर्शन करणारा, दिशा देणारा आहे. येत्या काळात ‘विविध भारती’ने कल्पक, नावीन्यपूर्ण, उद्बोधक असे मनोरंजन करणाऱया, माहिती देणाऱया दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती करावी. समकालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीनुरूप कार्यक्रम निर्माण केल्यास ‘विविध भारती’ जेन झीचीसुद्धा धडकन बनेल याची खात्री वाटते.