बीड जिल्ह्यात दोन महिन्यापुरताचा चारा शिल्लक; आजपासून चारा वाहतुकीवर बंदी, जिल्ह्याधिकार्‍यांचा आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण बीड जिल्ह्यात पुढचे दोन महिने पुरेल एवढाचा जनावरांचा चारा शिल्लक राहिला आहे. भविष्यामध्ये जनावरांच्या चार्‍याची टंचाई डोळ्यासमोर ठेवून प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. आजपासून बीड जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा आदेशच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जारी केला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाची भीषण दाहकता समोर येऊ लागली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील ट्रिगर 1 लागू झाला आहे. आगामी काळात जनावरांच्या चार्‍याची भयावह टंचाई निर्माण होणार आहे. जिल्ह्यात सध्या 1 लाख 92 हजार मेट्रीक टनच चारा शिल्लक आहे. हा चारा जेमतेम पुढील दोन महिने पुरेल एवढाच आहे. डिसेंबर महिन्यापासून जनावरांना काय खाऊ घालावे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. चार्‍याची उपलब्धता किमान दोन महिने तरी कायम रहावी. संभाव्य चारा टंचाई टाळता यावी यासाठी बीड जिल्ह्यामध्ये उत्पादीत होणारा व सध्या उपलब्ध असलेला, ओला आणि वाळलेला चारा बीड जिल्ह्याच्या बाहेर घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला आहे.