
अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात रत्नागिरी पोलीस दलाने उघडलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोठी कारवाई केली आहे. चिपळूण-कराड महामार्गावर गस्त घालत असताना पथकाने संशयास्पद वाहनाची झाडाझडती घेतली असता, त्यातून बेकायदेशीरपणे वाहतूक केला जाणारा लाखो रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला. या धडक कारवाईत आरोपीसह गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा मिळून एकूण १० लाख १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
जिल्ह्यात अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चिपळूण-कराड मार्गावर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एका संशयित वाहनाची हालचाल टिपून पोलिसांनी ते तात्काळ अडवले. तपासणीदरम्यान या वाहनातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला अवैधरीत्या नेला जात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेत संपूर्ण मुद्देमाल सील केला. ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे महामार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत.



























































