
हिंदुस्थानी कुस्तीपटू सुनील कुमारने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्यपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या 87 किलो गटात फिलिपिन्सच्या कॅलम रॉबर्ट्स जॉनस्टनचा तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे पराभव करत सुनीलने पदकावर कब्जा केला. या कामगिरीसह आशियाई स्पर्धेच्या ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात दोन पदके जिंकणारा तो पहिला हिंदुस्थानी कुस्तीपटू ठरला.
सामन्याच्या सुरुवातीलाच सुनीलने आक्रमक डावपेच आखत प्रतिस्पर्ध्याचा उजवा हात जखडला आणि त्याला चीतपट करत 4-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर ‘पार तेरे’ स्थितीत प्रतिस्पर्ध्याला मॅटवर ढकलत गुणांची कमाई केली. पहिल्याच फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर सुनीलने सामना खिशात घातला.
हांगझोऊनंतर नागोयातही कांस्य
सुनीलने 2023च्या हांगझोऊ आशियाई स्पर्धेतही कांस्यपदक पटकावले होते. त्यावेळी ग्रीको-रोमन कुस्तीत हिंदुस्थानचा तब्बल 13 वर्षांचा पदकाचा दुष्काळ त्याने संपवला होता. 2010च्या ग्वांगझू एशियाडमध्ये रविंदर सिंह आणि सुनील कुमार यांनी कांस्यपदक जिंकले होते.


























































